लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत खूपच कमी महिलांना संधी मिळाली. गतवेळी एकमेव आमगाव विधानसभा महिला उमेदवार रिंगणात होती. पण यावेळी इच्छुक महिलांची संख्या वाढली आहे. मात्र, किती लाडक्या बहिणींना तिकीट मिळणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून इच्छुक उमेदवारांच्या दिल्ली, मुंबई वाऱ्या सुरू आहेत. काही इच्छुकांनी मतदारसंघात पदयात्रा, संवादयात्रा या माध्यमातून मतांसाठी साखरपेरणी सुरू केली आहे. गेल्या पाच सहा निवडणुकांचा इतिहास पाहता चारपैकी एकाही मतदारसंघातून आतापर्यंत महिला उमेदवार विधानसभेत निवडणूक गेल्या नाहीत. कायमच पुरुषांना संधी मिळाली आहे.
यंदा किती महिलांना उमेदवारी मिळणार? यावेळी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. याअनुषंगाने महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका असल्याच्या वल्गना सर्वच राजकीय पक्षांकडून केल्या पक्षाकडून जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देतात हे निवडणुकीतच कळणार आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातून झाल्या महिला आमदार गोंदिया विधानसभा मतदारसं- घातून सन १९७८ ते १९८५ या कालावधीत राजकुमारी गोपाल- नारायण बाजपेयी यांना महिला आमदार म्हणून संधी मिळाली होती. यानंतर मात्र या मतदारसं- घातून एकाही महिलेला विधान- सभेत जाता आलेले नाही.
कोणकोणता पक्ष महिलांना प्राधान्य देणार? "महिलांचा राजकीय प्रक्रियेत निश्चितपणे सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधानांनी सकारात्मक भूमिका घेतली. संसदेच्या नव्या इमारतीत पहिल्याच दिवशी राज्यसभेत नारी शक्ती वंदन या विधेयकाला मंजुरी दिली. यात लोकसभा व विधानसभेसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे."- तुमेश्वरी बघेले, जिल्हाध्यक्ष भाजप महिला मोर्चा
"इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे महिलांना नेतृत्वाची संधी अभावानेच मिळाली. काँग्रेसने गोंदिया विधानसभा क्षेत्रातून सलग दोनवेळा महिला उमेदवारांना संधी दिली. इतर पक्षांनी त्यादृष्टीने पाऊले टाकली नाहीत. केवळ लाडकी बहीण म्हणायचे अन् महिलांना डावलायचे ही राज्यकर्त्यांची भूमिका योग्य नाही." - वंदना काळे, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस आघाडी
"उमेदवार महिला असो की पुरुष त्याने फरक पडत नाही. विषय आहे सामान्यांचा प्रश्न सोडविण्याचा. त्यासाठी लोकांमध्ये मिसळणारा व त्यांच्या अडचणींची जाणीव असणारा उमेदवार हवा. महिला उमेदवारांनी मागणी केली तर पक्षश्रेष्ठी त्यावर योग्य निर्णय घेतीलच."- माधुरी नासरे, शहरध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
"पुरुषांप्रमाणेच महिला नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातून गेल्या २५ ते ३० वर्षात एकही महिला विधानसभेत निवडून जाऊ नये, ही चितेची बाब आहे. महिला, पुरुष एकसमान म्हणायचे अन् पुरुषांनीच सत्ता गाजवायची, असे कसे चालेल, महिलांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. त्यासाठी दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे." - रुपा गिरीपुंजे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट