गोंदिया : कोरोनाला पायबंद घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे पाहिले जात आहे. त्याच दृष्टिकोनातून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक स्तरावर उपाययोजना करीत आहे; मात्र लसीकरणासाठी पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून याला वारंवार ब्रेक लागत आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण १४० केंद्रांवरुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरु आहे. एकाच दिवशी जवळपास ७ हजारांवर नागरिकांना लसीकरण केले जात होते; मात्र आता लसीकरणाची गती मंदावली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला १० हजार कोविशिल्ड आणि ३४०० कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले होते. या डोसचा सर्व लसीकरण केंद्रांना पुरवठा करण्यात आला. हे डोस देखील आता संपुष्टात आले असून सोमवारी केवळ चार-पाच केंद्र मिळून ७०० डोस शिल्लक होते. तर काही केंद्रांवर डोस उपलब्ध नसल्याने मोजक्याच केंद्रावरुन लसीकरण सुरु होते. मंगळवारी डोस प्राप्त न झाल्यास लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण ठप्प पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६६ हजारांवर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर जनजागृतीमुळे आता नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत आहेत; मात्र शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने मोहिमेला वारंवार ब्रेक लागत असल्याने नागरिकांमध्ये सुध्दा उदासीनतेचे वातावरण आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभाग व्यापक स्तरावर जनजागृती करीत आहे; मात्र शासनाकडे लसींचा पुरवठा होत नसल्याने मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. त्यामुळे शासनाने लसींचा पुरवठा वाढविण्याची गरज आहे.
...........
ते पाच हजार डोस केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठी
जिल्ह्यात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना एकूण पाच केंद्रांवरुन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने ५ हजार डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच या डोसचा वापर केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठीच करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे डोस त्यासाठीच वापरले जात आहे.
.........
केंद्रांना उद्दिष्ट ठरवून दिल्यानंतरही हिरमोड
शनिवारपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवरुन १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी एका केंद्राला दररोज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे व त्याचा संदेश गेला आहे त्यांनाच लस देण्याची सूचना आहे. मात्र शेड्युलमध्ये असलेल्या नागरिकांना लस मिळत नसल्याने त्यांना लसीकरण केंद्रावरुन लस न घेताच परत यावे लागत आहे.