गोरेगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १७ ही प्रभागात मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे.
यामध्ये प्रभाग ११ मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून, या प्रभागातील मतदारांना इतरत्र प्रभागात समाविष्ट करून मतदार पळवापळवीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जगदीश येरोला यांनी केला आहे.? मतदार यादीत झालेला घोळ दुरुस्त करून घोळ करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.? गोरेगाव नगरपंचायत हद्दीत १७ प्रभाग आहेत. विद्यमान नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या प्रशासकराज सुरू आहे.? येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे.? ज्या प्रभागात जे लोक राहतात त्या मतदारांना इतर प्रभागांतील मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याचे धाडस कुणी केले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे जगदीश येरोला यांनी म्हटले आहे.? गोरेगाव शहरातील जवळपासच्या गावातील लोकांचे नावसुद्धा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याच्या चर्चा शहरात आहेत. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.? याप्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे.? शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? अशी शंका वर्तविण्यात येत आहे.? काही इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आल्याचे नागरिक बोलत आहेत. नगरपंचायतच्या अनेक प्रभागांतील याद्यांमध्ये मतदारांची अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.? राजकारणामध्ये तरबेज आणी अभ्यासू वृत्ती व खेळाडूवृत्ती असणाऱ्या लोकांनी निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी नियोजन पूर्व मतदार यादीत नावे अदलाबदल केल्याचा आरोप जगदीश येरोला यांनी केला आहे.?
....
मतदार याद्यांची फेर तपासणी करा
गोरेगाव शहरातील सतरा ही प्रभागांत काही प्रमाणात मतदारांची इतर प्रभागात अदलाबदल झाली असली तरी प्रभाग १,९,१३,१४, १०, व ११ प्रभागात मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रभाग क्रं. ११ मध्ये तर ३० जवळपास मतदारांची नावे इतर गावांतील समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप येरोला यांनी केला आहे. मतदार यादीत घोळ असल्याची बाब लक्षात आल्यावर येरोला यांनी लगेच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष प्रभागमध्ये जाऊन चौकशी करण्याची मागणी केली.
.....