अर्जुनी-मोरगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अंतिम मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, १७ ही प्रभागांत मतदार याद्यांमधे प्रचंड घोळ निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ९, १० व ११ मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून, या प्रभागातील मतदारांना इतरत्र समाविष्ट करण्यात आले आहे. यातून मतदार पळवापळवीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप प्रभाग क्रमांक- १० चे माजी नगरसेवक तथा नगरपंचायतचे भाजप गटनेते देवेंद्र टेंभरे यांनी केला असून, मतदार यादीत झालेला घोळ दुरुस्त करून घोळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव नगरपंचायत हद्दीत १७ प्रभाग आहेत. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या प्रशासकराज सुरू आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धिकरण करून अद्ययावत करण्याचे काम बीएलओंना देण्यात आले होते. त्यामधे मृतांचे नाव वगळणे, लग्न होऊन गेलेल्यांची नावे वगळणे, नव्याने आलेले व १८ वर्षे झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रभाग बदलून गेलेल्यांची नावे शोधणे ही कामे गृहभेटीच्या माध्यमातून बीएलओंना करायची होती. मात्र, ही सर्व कामे घरी बसूनच करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ज्या प्रभागात जे लोक राहतात, त्या मतदारांना इतर प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करण्याचे धाडस कुणी केले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे टेंभरे यांनी म्हटले आहे.
शहरातील जवळपासच्या गावांतील लोकांची नावेसुद्धा नगरपंचायतच्या मतदार यादीत आल्याची चर्चा शहरात आहे. याचा अर्थ बोगस मतदारांचा शिरकाव तर झाला नाहीना, अशी शंका निर्माण झाली आहे. याप्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी मतदार यादीवर हरकत घेऊन ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती आहे. शहरातील राजकीय वर्तुळात वजन असणारे मतदार याद्यांमधे घोळ करण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. काही इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांचा अभ्यास करताना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार पळवापळवीची बाब निदर्शनास आली असल्याचे नागरिक सांगत आहेत. नगरपंचायतच्या अनेक प्रभागांतील याद्यांमधे मतदारांची अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप टेंभरे यांनी केला आहे.
राजकारणात तरबेज आणि अभ्यासू व खेळाडूवृत्ती असणाऱ्या लोकांनी निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी नियोजनपूर्व मतदार यादीत नावे अदलाबदल केली तर नसावी, असा आरोपही होत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील १७ ही प्रभागांत काही प्रमाणात मतदारांची इतर प्रभागांत अदलाबदल झाली असली तरी प्रभाग क्रमांक- १६, ९, १० व ११ मध्ये मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.
-------------------
१०० ज्या जवळपास नावे अन्य प्रभागांत
मतदार यादीत घोळ असल्याने सध्या शहरातील वातावरण तापले असतानाच प्रभाग क्रमांक-१० मध्ये तर सुमारे १०० च्या जवळपास मतदारांची नावे इतर प्रभागांत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप टेंभरे यांनी केला आहे. मतदार यादीत घोळ असल्याची बाब लक्षात आल्यावर टेंभरे यांनी लगेच नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रभाग क्रमांक -१० मध्ये नेऊन चौकशी करण्यास सांगितले. मतदार याद्यांमधे झालेला प्रचंड घोळ व अदलाबदल ही गंभीर बाब असून, घोळ करणारे व ही यादी प्रकाशित करणाऱ्यांची चौकशी करून दोषींना तडकाफडकी निलंबित करण्याची मागणी टेंभरे यांनी केली आहे.