युवराज गोमासे करडी (पालोरा) कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये मानव व वन्यप्राणी यांचा मागील काही दिवसात संघर्ष वाढला आहे. अशा घटनावर वन विभागाच्या वतीने काही उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. या संघर्षामुळे कधी मानवाचा तर कधी वन्यजीवांचा हकनाक बळी जात आहे.कोका वन्यजीव अभयारण्य सन २०१३ मध्ये अस्तित्वात आला. निसर्गाचा वरदहस्त व संरक्षण लाभल्याने अल्पावधीत वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढली. लागूनच अलसेले प्रादेशिक वन विभागाचे जंगल विरळ आहे. अभयारण्यातून लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत मिळेल, असा विश्वास शासनाचे वतीने दाखविण्यात आला. त्यामुळे नागरिकांनीही याला फारसा विरोध न दर्शविता सहयोग दिले. परंतु आज त्या विश्वासाला तडे जाताना दिसत आहेत. लोकांना पर्याप्त रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात वन विभागाला अपयश आले आहेत. उलट नागरिकांच्या जंगलावर आधारित गरजांवर निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे जंगलावर आधारित रोजगार बुडाला. जंगलात गुरे चराई व लाकूड कटाईवर मानवाला प्रतिबंध घातला आहे. दरम्यान अनेकांनी जंगलालगत अतिक्रमण करून वहिवाट सुरू केलेली असल्याने अनेक भागातील वन्यप्राणी बफर झोन, मानवी वस्त्यात शिरकाव करीत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मानव व वन्यप्राणी यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहेत. वन्यप्राण्याची भीती घालविण्यासाठी शासन, प्रशासनाने जनजागृती मोहिम राबविली. परंतु त्या मोहिमोंचा पाहिजे तसा परिणाम जाणवत नाही. बफर झोनमध्ये मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढला आहे. बफर झोन निर्मितीस अनेक गावांनी विरोध दर्शविला असून त्याची सुरुवात जांभोरा, केसलवाडा, लेंडेझरी, किसनपूर गावांपासून झाली आहे. त्याचे लोण इतर भागात पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.बफर झोन हा मानव व वन्यजीव यांच्या सहजीवनाचा क्षेत्र मानल्या जातो. परंतु याच क्षेत्रात ढिवरवाडा, चिखलाबोडी येथे बिबट्यांनी नरबळी घेतल्याच्या घटनांनी नागरिकांतील असंतोष उफाळून बाहेर पडला. त्याचवेळी बोंडे (खिडकी), ढिवरवाडा व अन्य ठिकाणी वन्यजीवांचा विद्युत करंट लावून जीव घेतला गेला. छुप्या मार्गानीही घातापातांच्या घटना त्यामुळे नाकारता येत नाही.बफर झोनमध्ये शेती पिकविणे वन्यप्राण्यांमुळे आव्हान ठरत आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान नेहमीचीच बाब झाली आहे. शेतातून त्यामुळे झालेला खर्च निघणे कठीण झाल्याने अभयारण्याशेजारील भागात शेकडो एकर शेती पडीत आहे. शासनाचे वतीने नुकसान भरपाईच्या नावावर तोंड पुसण्याचे काम केले जाते. अनेकदा मागण्या करूनही नुकसान भरपाईत वाढ झालेली नाही. नुकसानेचे पंचनामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चहापाण्यासाठी अडवणुकीचे व त्रास देण्याचे धोरण राबविले जाते, ते वेगळेच. शेतातच नाही तर रात्री घरातील गोठ्यात बांधलेले पाळीव प्राणीसुद्धा वन्यजीवांच्या निशान्यावर आहेत. त्यामुळे ग्रामस्थ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यातूनच वन्यप्राण्यांना मारण्यासाठी विद्युत करंट लावण्यासारखे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात किटकनाश टाकून मारण्याचा प्रकारही हाताळताना दिसतात. प्रशासनाच्यावतीने अनेकदा गावाला व शेतीला तारेचे कुंपण व इतर उपाययोजना करण्याचा विश्वास देण्यात आला. परंतु आश्वासनांच्या योजना अजूनही कागदावरच प्रत्यक्षात उतरल्या नाही. वन्यप्राण्यांपासून शेती व ग्रामस्थांना वाचविण्याची हमी देण्यात आलेली नाही. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वस्त्यांना बफर झोनमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी अभयारण्यात चांगले खाद्य, फळझाडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संघर्ष वाढीस लागला आहे. यावर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी स्वादिष्ट व विविधांगी खाद्य नाहीत. बफर झोनमध्ये त्यांना येण्यापासून रोखणाऱ्या यंत्रणा नाहीत. शासनाचे वतीने नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावात व शेतशिवारात वन्यजीवांचा हैदोस वाढला आहे. यावर उपाययोजनांची आवश्यकता आहे.- डॉ.सुनिल बोरकुटे, पर्यावरण व वन्यजीवप्रेमी, कारधा.मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करून वावर वाढविला आहे. त्यामुळे वन्यप्राणी क्षेत्राबाहेर येत असल्याने संघर्ष होत असल्याचे दिसून येते. यावर वनविभागाच्या वतीने उपाययोजना सुरु आहेत.- डी.एस. मारबदे, क्षेत्र सहाय्यक, कोका अभयारण्य.
बफर झोनमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष
By admin | Published: January 17, 2017 12:59 AM