अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सदन शेतकरी असून मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती करतात. यापूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. त्यामुळे मनुष्यबळ जास्त लागायचे. सतत मजूर वर्ग शेतातील कामासाठी लागायचे मात्र आता यंत्रयुग असल्याने बैलजोड्यांचा प्रमाण कमी होवून त्याऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत आहे. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम राहीले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीचे संकट घोंगावत आहे. शेतकरी प्रत्येक पीक लागवडीसाठी यंत्राचा उपयोग करीत आहे. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेती करण्याचे तंत्र बिघडत चालले असल्याने बारमाही शेतमजूर ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातही शेतीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. लागवड खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती असल्याने शेतमजुरांच्या हाताने शेतीची कामे न करता कमी कालावधीत अधिक कामे आटोपण्याच्या नादात शेतकरी वर्ग यंत्राच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे शेतमजुरांची परवड होवून उपासमारीची वेळ आहे.
शेती कामात यंत्राच्या वापरामुळे शेतमजुरांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:22 AM