सालेकसा : येथील पंचायत समितीत संपूर्ण तालुक्यात घरकुल योजना राबविण्यासाठी पाच अभियंते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु एक वर्षांपासून या गृहनिर्माण अभियंत्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहेत. लवकरात लवकर मानधन मिळवून द्यावे म्हणून त्यांनी आमदार सहषराम कोरोटे यांना निवेदन दिले असून, बीडीओमार्फत जिल्ह्यातील यंत्रणेला सुद्धा पत्र पाठविले आहे.
ग्रामीण गृहनिर्माण अभियंते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांची कामे करण्याकरिता मानधन तत्त्वावर अभियंते कार्यरत आहेत. त्याअंतर्गत सध्या संपूर्ण तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचे बांधकाम सुरू असून, प्रत्येक अभियंत्याकडे गावे वाटून देण्यात आली आहे. हे अभियंता नेमून दिलेल्या गावात प्रत्येक ठिकाणी घरकुल बांधकामाचे काम पाहण्यासाठी स्वखर्चाने येणे-जाणे करीत असतात. विशेष म्हणजे, मागील एक वर्षापासून या अभियंत्यांना मानधन मिळाले नाही. परिणामी त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, उपासमारीची पाळी आली आहे. त्यात इंधन दरवाढीमुळे पेट्रोल खर्च न परवडणारा झाला आहे. अशात मानधनाविना पुढे काम करणे कठीण झाले असून, या पुढे मानधन न मिळाल्यास काम बंद करावे लागेल. अशा इशारा गृहनिर्माण अभियंत्यांनी दिला आहे. तर लवकरात लवकर मानधन देण्यात यावे, अशी मागणी करीत त्यांनी आमदार कोरोटे यांना निवेदन दिले आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये देवेंद्र बाबुलाल हटिले, संजीव भाऊदास बोरकर, प्रितमलाल रामप्रसाद चिखलोंढे, सुनील भूपेंद्र कटरे आणि अनुप हिरालाल कटरे यांचा समावेश आहे.