वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार करणे सुरू केले आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. कोरोनामुळे नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. त्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत.
बसस्थानके ठरत आहेत शोभेची वास्तू
गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकांची निर्मिती करण्यात आली. या बसस्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाहीत, तसेच गोरेगाव मार्गे जाणाऱ्या बस या स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात बसस्थानकाची बांधणी झाल्यावर बऱ्याच दिवसांनी बसथांबा होता; पण आजघडीला या स्थानकावर बसचा थांबा नाही.
घाटकुरोडा- देव्हाडा रस्ता उखडला
मुंडीकोटा : जवळील ग्राम घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. या मार्गावरून शालेय विद्यार्थी सुद्धा नियमित ये-जा करतात. त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
दिव्यांग-निराधारांवर उपासमारीची पाळी
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना ४-५ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधारांची ना काम ना पैसा, अशी स्थिती झाली आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
तंटामुक्त समित्यांचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त झालेल्या गावांना बक्षीसरूपात रक्कम दिली. आता समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधी पसरते. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.
मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे केव्हाही मोठा धोका होऊ शकतो.
‘ऑनलाइन’ खरेदी ग्रामीण भागात तेजीत
गोंदिया : ग्रामीण भागापर्यंत ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचतही होत असल्यामुळे अनेकजण ऑनलाइन वस्तू खरेदी करत असल्याचे दिसत आहे. मात्र, अनेकदा काही फसव्या योजनांमुळे अनेकदा ग्राहकांच्या खात्यातून पैसे गेल्याच्याही तक्रारी वाढत आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे
गोंदिया : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलद सेवा मिळावी, हा शासनाचा उदात्त हेतू आहे. मात्र हे देताना दिसून येत नाही.