गोंदिया : वर्ग १ ते ८ वी साठी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकीण व मदतनिसांना मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांना मानधन देण्यासाठी निधी नाही असे नाही. निधी उपलब्ध असतानाही पंचायत समित्यांकडून त्या महिलांना मानधन देण्यात आले नाही. गोंदिया जिल्ह्यात शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकीण व मदतनिस म्हणून २ हजार ५४८ महिला कार्यरत आहेत. त्यांना केंद्र शासनाकडून ७५० रूपये तर राज्य शासनाकडून २५० रूपये असे एकूण एक हजार रूपये मानधन देण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील २५४८ स्वयंपाकीन व मदतनिसांना मानधन देण्यासाठी केंद्र शासनाकडून २ कोटी ४० लाख ५० हजार रूपये गोंदियाच्या शिक्षण विभागाला देण्यात आले. तर राज्य शासनाने ८० लाख २९ हजार रूपये असे एकूण ३ कोटी २० लाख ७९ हजार रूपये दिले आहेत. यातील केंद्रशासनाचे दोन कोटी आठ लाख १४ हजार तर राज्य शासनाचे ६९ लाख ३८ हजार रूपये असे एकूण २ कोटी ७७ लाख ५२ हजार रूपये गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समित्यांना देण्यात आले. शिवाय मदतनिस व स्वयंपाकीनच्या मानधनाचे केंद्रशासनाचे ३२ लाख ३६ हजार व राज्य शासनाचे १० लाख ९१ हजार रूपये असे एकूण ४३ लाख २७ हजार रूपये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत. पंचायत समित्यांना मानधनाचे पैसे देऊनही ते पैसे त्या मदतनिस व स्वयंपाकीण यांना मिळाले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील २५४८ या स्वयंपाकीण व मदतनिसांवर उपासमारीची पाळी आली आहे. मागील सहा महिन्यांपासून त्यांना मानधन न दिल्यामुळे त्यांनी आपली उपजीविका कशी चालवावी हा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आहार शिजविणाऱ्या महिला उपाशी
By admin | Published: April 09, 2015 12:58 AM