गोंदिया : सुरुवातीचे दोन-तीन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. त्यानंतर मात्र आता उन्ह चांगलेच तापत आहे. जिल्ह्याचा पारा ३४.५ अंशावर गेला असून यावरून उन्हाची दाहकता जाणवेल. या उन्हामुळे जिल्हावासी घामाघूम होत असून हिवाळ्याच्या दिवसांत उन्हाळा तापताना दिसत आहे.
निसर्गाने ऋतुचक्र ठरवून दिले असून पावसाळ्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होते, असा क्रम आहे. त्यानुसार, आता पावसाळा संपला असून हिवाळा अपेक्षित आहे. मात्र, पावसाने दडी मारून पावसाळा संपल्याचे स्पष्ट केल्यानंतर थंडी नव्हे तर उन्हाचे चटके वाढले आहेत. हे उन्ह एवढे तापत आहे की, दिवसा अंगाची लाहीलाही होत असून जिल्हावासी घामाघूम झाले आहेत. गुरुवारी (दि.१२) जिल्ह्यांचा पारा ३४.५ अंशावर होता. एवढ्या उन्हामुळे नागरिकांना आता दुपारी बाहेर पडणे कठीण होताना दिसत आहे.
गुलाबी थंडीची सर्वांना प्रतीक्षा- ऑक्टोबर महिना अर्ध्यावर सरला असून सकाळी व रात्री हलकी थंडी जाणवत आहे. मात्र, दिवसा उन्हाची तीव्रता घाम फोडत आहे. आतापर्यंत थंडीचा जोर वाढणे अपेक्षित होते. मात्र, पर्यावरणाचे संतुलन ढासळले असून हिवाळ्यावर उन्हाने हिवाळ्यावर कब्जा केला आहे. हेच कारण आहे की, पारा ३४ अंशांवर जात आहे.
आरोग्यावर विपरीत परिणाम- सकाळी व रात्री थोडीफार थंडी जाणवत असतानाच दिवसा मात्र कडक ऊन तापत आहे. ढवळलेल्या या वातावरणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तापाची साथ पसरली असतानाच आता सर्दी व खोकला जोर धरीत आहेत.
उच्च तापमान असलेल्या शहरांचा तक्ताअकोला- ३७.५
अमरावती - ३६.६ब्रह्मपुरी ३६.२
वाशिम- ३६गोंदिया- ३४.५