बालसंस्कार शिबिरात वक्त्यांचा सूर : आईपासूनच संस्काराची सुरूवात लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : संस्कार हे प्रत्येकातच उपजत असतात. प्रत्यक्ष आचरणातून आपण जसा आकार देतो त्याप्रमाणे बालमनात संस्काराची जडणघडण होत असते. केवळ शिक्षण म्हणजे संस्कार नव्हे, शिक्षण व व्यक्तिमत्व विकासातून सुसंस्कार घडतात. बालकांची पहिली शाळा म्हणजे आई. आईपासूनच संस्काराची सुरुवात होते. त्यामुळेच ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उध्दारी’ असे म्हटले जात असल्याचा सूर अर्जुनी-मोरगाव येथील बहुउद्देशिय हायस्कूलमध्ये झालेल्या बालसंस्कार शिबिरात वक्त्यांनी व्यक्त केला. उद्घाटन संस्थेचे सचिव गोविंदराव ब्राम्हणकर यांचे हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अनिरूध्द ढोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. राजेश चांडक, नगरसेवक माणिक मसराम, नगरसेविका गीता ब्राह्मणकर, पतिराम मुनेश्वर, संपत कठाणे, नमिता शिवणकर, रंजना ब्राह्मणकर, राजगिरे आदी उपस्थित होते. डॉ. चांडक म्हणाले, सुसंस्कारीत, आदर्श पिढी हेच देशाचे भवितव्य आहे. त्यात सदाचार, साधना, धर्मप्रेम, योगा-प्राणायाम व राष्ट्रभक्तीच्या शिकवणीची गरज आहे. अनिरुध्द ढोरे म्हणाले, संस्कारासह शरीर आणि मन विकसीत केले पाहिजे. विचार आणि विवेक ही प्रगतीची कारणे आहेत. शिक्षकीपेशा हे सतीचे वाण आहे म्हणून शिक्षकांनी ज्ञानार्जन व ज्ञान प्रसाराला वाटून घेतले पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञ, थोर संत, पराक्रमी राजे व क्रांतीकारकांच्या योगदानाची जाणीव करुन दिली पाहिजे, असे ते म्हणाले. या शिबिरात योगा-प्राणायाम, अंधश्रध्दा, सर्प, पक्षी निरीक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चित्रफीतीद्वारे ओळख करून देण्यात आली. प्रा. गोपाल पालीवाल यांनी शिबिरार्थीना सापांविषयी माहिती देताना सांगितले की, साप हा आपला व शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो इको-सिस्टम परीसंख्या व साखळीचा एक घटक आहे. त्यामुळे कुणालाही आढळल्यास त्याला न मारता लगेच वनविभागाला सूचना द्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आर.डी. चुटे यांनी मांडले. संचालन मोरेश्वर बोकडे यांनी केले. शिक्षक मुरकुटे यांनी आभार मानले. शिबिरासाठी मुख्याध्यापिका सुनिता हुमे, राहुल ब्राम्हणकर, आर.डी. चुटे, कुंभलवार, फुंडे, फाये, परतेकी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. - पक्षी निरीक्षणावर मार्गदर्शन एस.एस.जे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांनी पक्ष्यांबाबतची सखोल माहिती शिबिरार्थ्यांना दिली. त्यांनी पक्षी संरक्षण, निरीक्षण, संवर्धन, परागीभवन, अशा विविध पैलुंवर प्रकाश टाकला. पक्षी निरीक्षणात पक्ष्याचा रंग, शरीरयष्टी यावरून ओळख पटविली जाते. त्यांनी चिमणी, घार, सूर्यपक्षी, बजाज या पक्ष्यांची चोच व त्यांची उपयुक्तता चित्रफीतीद्वारे शिबिरार्थ्यांना समजावून सांगितले. याचाच एक भाग म्हणून शाळा परिसरानजीकच्या गावतलाव व कालव्याशेजारी पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जावून त्यांची ओळख पटवून दिली. दुर्बिणच्या सहाय्याने पाणकावळे, जांभळी, पाणकोंबडी, खंड्या, धोबी, जांभळा सूर्यपक्षी, विविध रंगानी नटलेला निळकंठ, उघड्या चोचीचा करकोचा, अशा विविध पाणपक्ष्यांची सखोल माहिती दिली. सरतेशेवटी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने घराच्या आवारात व परिसरात कृत्रीम घरटी तयार करून पक्ष्यांसाठी खाद्याची व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आदर्श पिढी देशाचे भवितव्य
By admin | Published: May 31, 2017 1:15 AM