केशोरी : गावाच्या विकासात लोकांच्या निर्णयाचा सहभाग असावा, या चांगल्या उद्देशपूर्तीकरिता ग्रामपंचायत सदस्यांसाठी विविध आदर्श विषय समित्या तयार करून गावाच्या विकासात हातभार लागावा म्हणून कार्यान्वित केल्या आहेत. परंतु, या परिसरातील ग्रामपंचायतस्तरावर निर्माण केलेल्या विषय समित्या शासनाच्या दुर्लक्षामुळे कागदावर असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतींना मिळालेल्या अधिकाराच्या बाबतीत लोकनियुक्त विरोधी प्रतिनिधी नेहमीच ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल उदासीन असतात. त्यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करून त्यांच्या कार्याची जाणीव करण्याची कामे करत होती. परंतु, अलीकडे तशी प्रशिक्षण शिबिरे बंद झाली आहेत. गावातील नागरिकांची जबाबदारी आणि विश्वासातील संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीच्या कार्यरचनेत विविध जबाबदाऱ्या व अधिकार देण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या विविध समित्या स्थापन करून त्यांची कार्ये निश्चित केली आहेत. त्यात बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, रस्ते विकास समिती, शालेय ग्राम शिक्षण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, दक्षता समिती, तंटामुक्त समिती, संयुक्त पर्यावरण समिती अशा विविध समित्या ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करून या समित्या गावातील मूलभूत कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात.
परंतु, या समित्या फक्त ग्रामपंचायतीच्या दप्तरात दिसून येत आहेत. कोणत्याच गावातील ग्रामपंचायत या समित्यांची बैठक आयोजित करताना दिसत नाही. परिणामी या समित्यांचा गाव विकासात हातभार लागल्याचे दिसून येत नाही. यावरून ग्रामपंचायतीच्या आदर्श विषय समित्या शासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत दप्तरामध्येच स्थापन असल्याचा अनुभव येत आहे.