गोंदिया : आजकाल धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वाहनांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, अन्यथा वाहनमालकांचे नुकसान होते. सायकल, दुचाकी, तीनचाकी, कार, प्रवासी व जड वाहतुकीच्या प्रत्येक वाहनाला टायर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर खराब होणे परवलीचे असताना आता वाढत्या तापमानात टायर माना टाकत आहेत.
सध्या चाळिशीजवळ पोहोचलेल्या तापमानामुळे डांबरी रस्ते चटके देत आहेत. उन्हाच्या तडाख्याने टायरची झीज होणे, टायर फुटणे व तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी व जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर जास्त प्रमाणात खराब होत आहेत. कडक उन्हाळ्यात तासन्तास प्रवास करताना अनेक वेळा काही लोकांच्या वाहनांचे टायर फुटतात. टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.
टायर्ससाठी एवढं करा...
- टायरचं आयुष्य तीन वर्षे किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खरेदी करू नका. उन्हाळ्यात जास्त गाडी चालवल्याने टायर फुटण्याची भीती असते. त्यामुळे टायरमध्ये प्रेशर चेक करा.
- ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. कारण, उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने फ्युअल लिकेज होऊ शकते. अनेकदा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता कमीच ठेवा. उन्हात कारचा रंग उडू शकतो. तसेच टायर फेल होऊ शकते.
रिमोल्डचा पर्याय
-प्रवासी व व्यावसायिक वाहतुकीच्या वाहनांना रिमोल्ड टायर वापरत नाहीत. दुचाकी व तीनचाकीचे वाहनधारक रिमोल्ड टायर खरेदी करीत आहेत. मध्यमवर्गीय दुचाकी व रिक्षाचालक मात्र वाहनांसाठीचे जादा टायर रिमोल्ड दर्जाचे वापरतात.
-टायर फुटण्याच्या प्रकाराने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण तर वाढतेच, सोबतच यापूर्वी काढलेल्या पंक्चरचे ठिगळ वितळत आहे. याचा वाहनधारकांना फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
काय म्हणतात विक्रेते
टायरच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ असतेच, वाहतूक खर्च वाढल्याने टायरच्या किमती वधारल्या आहेत. टिकाऊ ब्रॅण्डला वाहनधारक अधिक पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
- जी. एम. ठाकरे, टायर विक्रेता