गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. गुन्ह्याच्या तपासात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून ते कार्य करीत असतात. कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन ग्राम व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना संक्रमित होऊन राज्यातील २० पोलीस पाटलांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान कार्य करीत असताना अनेक ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले व गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पोलीस पाटलांना कायद्यानुसार संरक्षण द्यावे ही मागणी अनेक वर्षांपासून पोलीस पाटील संघटना करीत होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
......
कलम ३५३ नुसार होणार गुन्हा दाखल
गृह विभागाने ७ जून २०१८ अन्वये भादंवि ३५३ कलमामध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासकीय लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावीत असताना मारहाण झाल्यास संबंधिताविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. संबंधित कक्षेत पोलीस पाटील येत असून, ३ मार्चला २०२१ च्या अधिसूचनेनुसार पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचे समजून संबंधिताविरुद्ध कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
.....
पाठपुराव्याला आले यश
या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी स्वागत केले आहे. लवकरच पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून त्यांना सेवानिवृत्तीची योजना लागू करून त्यांना वृद्धापकाळात जगण्यासाठी सरंक्षण प्रदान करावे, अशी मागणी केली आहे. जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, सचिव राजेश बन्सोड, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, अनिता लंजे व गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेने पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले आहे.