गोंदिया : पावसाळ्यात वीज कडकडाट करून पडण्याचे प्रकार घडत असून यातच मानवासह जनावरांचाही जीव जातो. वीज कडाडली की नागरिक मिळेल त्या जागी आश्रय घेतात तसेच आपल्या जनावरांना बांधून मोकळे होतात. मात्र, अशातच त्यांचा घात होतो. म्हणूनच विजेचा कडकडाट झाल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबत आजही कित्येकाला माहिती नाही. यामुळेच जिल्ह्यात सन २०१८ पासून आतापर्यंत २१ जणांचा जीव गेला आहे. यामुळे विजेचा कडकडाट झाल्यास लोखंडी वस्तूंपासून दूर राहून अशा ठिकाणी आश्रय टाळावा. पक्क्या व मजबूत बांधकामाखालीच आश्रय घ्यावा ही बाब प्रामुख्याने प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आहे.
---------------------------
वीज पडल्याने झालेले मृत्यू
२०१८ - ३
२०१९- ३
२०२०- ९
२०२१ (१५ जुलैपर्यंत)- ६
------------------------
कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई
- सन २०१८ मध्ये वीज पडून जिल्ह्यात ३ जणांना मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे.
- सन २०१९ मध्ये ३ जणांना वीज पडून मृत्यू झाला असून यातील दोघांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, एक प्रकरण अपात्र ठरविण्यात आले आहे.
- सन २०२० मध्ये वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला असून या सर्वांनाच शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
---------------------------------
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
- ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट होत असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे किंवा सुरक्षित स्थानी राहावे.
- विजेचा कडकडाट होताना धातूच्या वस्तूंपासून (टिनाचे शेड, लोखंडी खांब) दूर राहावे.
- विजेचा कडकडाट होत असताना शक्यताे मोबाइलचा वापर टाळावा. तसेच घराती वीज उपकरण त्वरित बंद करावे.
- शेतकऱ्यांनी शेतात काम न करता त्वरित पक्क्या बांधकामाखाली आश्रय घ्यावा. जनावरांनाही झाड किंवा शेडखाली बांधू नये.
- राजन चौबे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
---------------------------
अंजोरा व काटी येथे वीज अटकाव यंत्रणा
जिल्ह्यात २ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी येथे वीज अटकाव यंत्रणा असून आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे.