गोंदिया : वाहन चालविताना एखादा वाहनचालक स्वत:च चूक करून आपल्या वाहनाला डॅश मारेल आणि विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करीत असेल, तर सावध व्हा. कारण तो आपल्याला लुटण्याचा मानस बांधून असेल. अशा घटना समाजात सतत घडत आहेत. अशा घटना जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण वाहन चालविताना सावधानपूर्वक वाहन चालवावे. विनाकारण कुणी वाद घालत असेल, तर त्याला टाळण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तो आपल्याशी वाद घालून आपल्याला लुटू शकतो.
अशा घटना विशेष करून निर्जनस्थळी होतात. रात्रीच्या वेळी आपण प्रवास करीत असाल, तर आणखीनच सावध व्हा. कुणी वाहन रस्त्यावर टाकून एखादी व्यक्ती झोपून राहतो. समोरून येणाऱ्या वाहन चालकाला हा अपघात झाला असावा असे वाटेल. वाहन थांबवून एखादी व्यक्ती मदतीसाठी गेली, तर रस्त्यावर झाेपून असलेली व्यक्ती व त्याच्या मदतीसाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा-झुडपात लपून बसलेले त्याचे सहकारी आपल्यावर अटॅक करतील आणि आपल्याजवळील मौल्यवान दागिने व पैसे लुटून नेतील. यासाठी शक्यतो आरोपी विनाक्रमांकाच्या वाहनांचा वापर करतात. आपण लुटून पसार झालो तरी आपल्याला पकडण्यासाठी मोटारसायकलचा क्रमांक समाेरच्याला दिसू नये, अशी शक्कल आरोपी लढवितात. यासाठी प्रत्येक वाटसरूने सतर्क राहणे गरजेचेे आहे.
.....................
असे तुमच्याबाबतीतही घडू शकते
१) आपण रस्त्याने बिनधास्त वाहन चालवित जात असाल, तर आपल्याशी वाद घालण्याची मनीशा ठेवून आपल्याला लुटण्याचा बेत ठेवणारे लोक विनाकारण आपल्या वाहनाने तुमच्या वाहनाला धडक देतील. अशी परिस्थिती निर्माण करतील, त्यानंतर आपल्याशी वाद घालून आपल्याला लुटून पळून जातील.
...
२) रात्रीच्यावेळी मोटारसायकलने जाणाऱ्या लोकांना किंवा चारचाकी चालविणाऱ्या लोकांना कसे लुटता येईल यासाठी समाजकंटकांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. रस्त्यावर अपघात झाल्याचे दर्शवून एखादी व्यक्ती वाहन फेकून रस्त्यावर झोपून राहील, तर त्याचे साथीदार रस्त्याच्या कडेला दबा धरून बसले असतात. एकांतवास असलेल्या ठिकाणी बहुदा असे घडते.
......................
काय काळजी घ्याल?
आपण रस्त्याने जात असताना सतर्क राहा, आपल्या वाहनावर कुणी वाहन आणत असेल किंवा त्याची मनशा योग्य वाटत नसेल, तर आपण काळजी घ्यावी. रस्त्यावरून जाताना कुणी अपघात केल्याचे सोंग करून पडला असेल तर क्षणार्धात ओळखा व आपले वाहन थांबवू नका. अन्यथा आपल्यावर झडप घालून आपल्याला लुटले जाईल.
.........
गोंदिया जिल्ह्यात अशा लुटीची तक्रार नाही
धावत्या वाहनावरून पैसे लुटल्याची तक्रार डुग्गीपार पोलिसात दाखल झाली. परंतु आतापर्यंत विनाकारण वाद घालून लुटल्याच्या घटना ऐकिवात नाहीत. परंतु कोरोनामुळे वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.
........................