लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी केंद्रांना दिलेले खरेदी उद्दिष्ट आणि शासनाला पाठविलेली यादी ही ऑनलाईन पोर्टलवर जुळत नसल्याने शासकीय धान खरेदीला प्रारंभ होण्यास विलंब होत आहे. मागील दोन दिवसांपासून ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ती अद्यापही दूर झाली नसल्याने धान खरेदी सुरू होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. यंदाच्या खरीप हंगामापासून धान खरेदी करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे तेवढेच धान खरेदी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना धानाची विक्री करायची आहे त्यांना शासनाच्या एनईएल या ऑनलाईन पाेर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ९५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी केली आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी आटोपली आहे. शेतकरी धान विक्री करण्यासाठी बाजारपेठेत आणत आहेत. पण अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अल्पदरात गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यापूर्वी आम्ही सर्व धान खरेदी केंद्रांना २ नोव्हेंबरला धान खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. पण ऑनलाईन पाेर्टलवरील धान खरेदीचे टार्गेट जुळत नसल्याने धान खरेदी सुरू करण्यास अडचण होत आहे. ही अडचण पुन्हा चार-पाच दिवसात दूर होण्याची शक्यता कमी असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे धान खरेदी सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.
चौकशी पुन्हा थंडबस्त्यात - धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची काही केंद्रांनी परस्पर विक्री केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर या केंद्राची चौकशी सुरू करण्यात आली. पण त्यानंतर या खरेदी केंद्राचे नेमके काय झाले, हे कळण्यास मार्ग नाही.
जेवढा विलंब तेवढा खासगी व्यापाऱ्यांचा फायदा यंदा दिवाळी आटोपली तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. त्यातच जेवढा उशीर शासकीय धान खरेदीला होईल, तेवढाच फायदा खासगी व्यापाऱ्यांचा होणार आहे. दरम्यान, या संधीचा ते फायदा घेत आहेत.
हमीभाव २०४० रुपये, धान घेतले जातेय १६०० रुपये क्विंटल- शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी हमीभावाने धान खरेदी केली जाते. पण शासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या दिरंगाईमुळे अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १६०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
पुन्हा राजकीय नेत्यांच्या जवळच्यांना धान खरेदी केंद्र धान खरेदीचा घोळ गाजत असतानाच जिल्ह्यातील नवीन काही धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यात सर्वाधिक केंद्र ही राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना देण्यात आली आहेत. हे धान खरेदी केंद्र मंजूर करताना नियमांना सुद्धा डावलण्यात आल्याची माहिती आहे.