लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. असे असताना अनेकांची मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, हे मतदान ओळखपत्र काढताना ही चूक झाल्यास तुम्हाला तब्बल एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.
यापासून बचाव करण्यासाठी ही माहिती असणे आवश्यक आहे. निवडणूक ओळखपत्र आजही खूप महत्त्वाचे आहे. केवळ निवडणूक आली की नाही तर इतर सरकारी कामांसाठीदेखील हे ओळखपत्र उपयोगी पडते. परंतु, आजही अनेकांकडे एकापेक्षा जास्त ठिकाणची ओळखपत्रे असतात. अशाप्रकारे एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक व्होटिंग कार्ड असणे गुन्हा आहे. यासाठी एक वर्षाची शिक्षादेखील होऊ शकते.
ऑनलाइन सुविधा उपलब्ध ऑनलाइनसाठी तुम्हाला ईसीआयच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. तिथे तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म-७ भरावा लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का? हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.
सरेंडर कसे करावे एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी तुम्हाला फॉर्म-७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस तुम्ही ऑनलाइन किवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता. सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
नको असलेले कार्ड रद्द करातुमच्याकडे असेच जुने, गावाकडचे निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सरेंडर करा, यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे. ऑफलाइन म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून तुम्ही तुमचे नको असलेले ओळखपत्र रद्द करू शकता.
तरच होईल तुरुंगवासमतदार ओळखपत्र हा एक आवश्यक सरकारी दस्तऐवज आहे. नागरिकांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य असते. पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र बाळगल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कारण मतदार यादीत एकापेक्षा जास्तवेळा मतदार म्हणून नोंदणी केल्यास तो एक गुन्हा धरला जातो.