२० दिवसांत अंमलबजावणी करा : सर्व विभाग प्रमुखांना निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील तीन वर्षांपासून अपंग कल्याणकारी संघटनेने जिल्हा व शासन स्तरावरील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. दिलेल्या मुदतीत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोनदा संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग संघटनेने नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. मागील तीन वर्षात दिव्यांगांचे अनेक प्रश्न सुटले. मात्र प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने जानेवारी महिन्यात चार दिवसीय उपोषण करून जिल्हा प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार २० फेब्रुवारी व १५ मार्च रोजी सर्व विभाग प्रमुखांना मुदतीत सदस्या सोडविण्याचे निर्देशही दिले होते. परंतु त्यावर योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे १८ एप्रिल २०१७ रोजी संघटनेचे दिगंबर बन्सोड, दिनेश पटले, आकाश मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना तशी माहिती देण्यात आली. यावर मंगळवारी, ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व तसा अहवाल सादर करावा अन्यथा प्रशासकीय कारवाईसाठी तयार रहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले. या सभेत दिव्यांगांचा अनुशेष तात्काळ भरणे, सर्व विभागाने प्रत्येक योजनेत दिव्यांगांना तीन टक्के प्रमाणे लाभ द्यावे व कर्मचाऱ्यांवर खर्च करू नये, ग्रामपंचायत अंतर्गत तीन टक्के निधी खर्च करावे, घरटॅक्समध्ये ५० टक्के सवलत द्यावे, तालुकास्तरीय शिबिर घेवून अपंग प्रमाणपत्र द्यावे, अंतोदय योजनेत समाविष्ट करावे, गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच नगर पंचायतींनी दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दोन वर्षाच्या अनुशेषासह तीन टक्के निधी खर्च करावे, अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व मागण्या शासन निर्णयाप्रमाणे असल्यामुळे संबंधित विभाग प्रमुखांनी २० दिवसांत अंमलबजावणी करावे, असे सभेत सांगण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपंग कल्याणकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर बन्सोड, जिल्हा सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, शामसुंदर बन्सोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अजय केवलिया, बँक व्यवस्थापक श्रीवास्तव, अपंग महामंडळाचे व्यवस्थापक मुळे, उपकार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) वाघाये, पुरवठा विभागाचे प्रतिनिधी, न.प. गोंदियाचे मुकलवार, विनोद शेंडे, सहेबाज खान, शोभेलाल भोंगाडे, हरीश गुप्ता, नितीन निखाडे, राजकुमार दमाहे, रूमन मरस्कोल्हे, सागर बोपचे तसेच इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
दिव्यांगांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:20 AM