लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून मागील दहा वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. आता या उमेदवारांना शासनाकडून नोकर भरतीवर बंद असल्याचे सांगितले जात असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे.शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाधारक उमेदवार म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. मात्र स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या धोरणामुळे मागील दहा वर्षांपासून जिल्ह्यातील ३५० अनुकंपाधारक उमेदवार शासकीय सेवेत रूजू होण्यापासून वंचित आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध पदभरती करिता या उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता आहे. मात्र यानंतरही प्रशासनानेतर्फे या उमेदवारांना आश्वासन देत नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. यापैकी बºयाच उमेदवारांचे वय ४५ वर्ष झाल्याने त्यांना सुध्दा शासकीय सेवेत रूजू होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. अनुकंपाधारक उमेदवारांनी यासंदर्भात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना प्रत्येकवेळी केवळ आश्वासन दिले जात आहे. मागील पाच वर्षांत एकाही अनुकंपाधारक उमेदवाराला शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा अनुकंपाधारक संघर्ष समितीच्या नेतृत्वात या बुधवारी (दि.२७) उमेदवारांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.रविंद्र ठाकरे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत त्यांच्यासमोर समस्या मांडली. मात्र ठाकरे यांनी नोकर भरतीवर बंदी असल्याचे सांगितले. त्यामुळे अनुकंपाधारकांची समस्या कायम आहे.२६ जानेवारीपूर्वी अनुकंपाधारक उमेदवारांचा प्रश्न मार्गी न लावल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भोला गुप्ता, संजय हत्तीमारे, संदीप मानकर, संजय शहारे यांनी दिला आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:11 PM
अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून मागील दहा वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. आता या उमेदवारांना शासनाकडून नोकर भरतीवर बंद असल्याचे सांगितले जात असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देप्रशासनाने दाखविले शासनाकडे बोट : उमेदवारांचा आमरण उपोषणाचा इशारा