लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरातील मामा तलाव नागरिकांना सिंचन सोयीसाठी उपयुक्त आहे. सदर तलावाचे सौंदर्यीकरण व परिसरात वृक्ष लागवड करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसेच येथे पर्यटन स्थळ बनवून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविणे सोईस्कर आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तलाव परिसरात अतिक्रमण वाढले आहे.आमगाव शहराच्या मध्यभागी असलेला मामा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या तलावाला विकासाची प्रतीक्षा आहे. शासन योजना हाती असून सुध्दा या तलावाच्या विकासासाठी अद्याप पाऊल उचलले गेले नाही.शहराच्या मध्य भागात असलेला तलावात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना सिंचनाच्या सोयीसाठी मदत होते. परंतु तलावात नागरिकांकडून मूर्ती विसर्जन, पूजा साहित्य विसर्जनामुळे तलावातील खोलीकरणावर परिणाम झाला आहे. तलाव परिसरातील टाकाऊ वस्तूमुळे प्रदूषणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिक वस्ती प्रदूषणामुळे त्रस्त झाली आहे.पर्यटनस्थळ विकास व सौंदर्यीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमाने या तलाव परिसराचे विकासाकरिता वाव आहे. तर नरेगा अंतर्गत तलाव खोलीकरणाच्या योजना आहेत. परंतु योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नाही. तलाव परिसरात वृक्ष लागवडीतून पर्यावरणाला वाव आहे.तलाव खोलीकरणातून स्वीमिंग टँक, बोटींग ट्रॅक, वॉटर स्लायडर व गार्डनची संकल्पना पुढे आल्यास या तलावाचा उपयोग नागरिकांना होवू शकेल. तर याच पर्यटन स्थळातून शासनाला कराच्या स्वरुपात नागरिकांकडून निधी गोळा करता येईल.शासनाच्या विविध योजनांतून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. योजना व निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाकडे नियोजन प्रस्ताव नसल्याने ही तलावे संपण्याचा मार्गावर आहेत.तलाव परिसरात नागरिकांनी अतिक्रमण करुन त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. त्यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.तसेच तलाव परिसरात टाकाऊ वस्तुंचे खच साचत असल्याने पर्यावरणाची समस्या आवासून उभी आहे. या परिसरात स्वच्छता राखून ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक ठरले आहे.
मामा तलाव सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 9:55 PM
शहरातील मामा तलाव नागरिकांना सिंचन सोयीसाठी उपयुक्त आहे. सदर तलावाचे सौंदर्यीकरण व परिसरात वृक्ष लागवड करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसेच येथे पर्यटन स्थळ बनवून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविणे सोईस्कर आहे.
ठळक मुद्देअतिक्रमण : तलाव खोलीकरण व वृक्ष लागवड थंडबस्त्यात