नागरिकांची गैरसोय : अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी मुंडीकोटा : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे देशाच्या रक्त वाहिन्या आहेत. त्यांची देखभाल देशाला जिवंत ठेवते. रस्त्यावरून परिसराचा विकास समजतो. ही जवाबदारी सांभाळणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे. मात्र सदर विभागाचे रस्त्याच्या दैनावस्थेकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे रस्त्यांची आखणीचा अधोगती होत आहे. मुंडीकोटा ते घोगरा मार्गावरील गिट्टी व डांबर पूर्णत: उखडली आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर अनेकदा अपघात घडतात. परंतु संबंधीत विभाग रस्त्याच्या दुरूस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशाच प्रकार घाटकुरोडा ते देव्हाडा/एलोरा पेपर मिल या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. या रस्त्यावरून रेतीचे ट्रॅक व ट्रॅक्टर रेती भरून नेहमीच जात असतात.त्यामुळे हा रस्ता यावेळी जीर्ण अवस्थेत आहे.या रस्त्यावरील डांबर व मुरूम रस्त्यावरील कुठे गेला त्यांचा पत्ताच नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खोल व रूंद खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या मार्गाच्या बाजू मोकळ्या नसल्याने फुटल्या मार्गावरूनच ये-जा करणे भाग पडते. येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या मार्गाने तिरोडा आगाराची स्कूल बस घोगरा गावांपर्यंत येते. सकाळी विद्यार्थी घेऊन परत जात असते. तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया (घाटकुरोडा) प्रवासी बस सुरू आहे. पण रस्त्याअभावी ही बस बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही बस चालवितांना चालकाला जीव मुठीत घेऊन बस चालवावी लागते. तर प्रवाशी प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. यावेळी हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अपघात केव्हा होईल यांचा अंदाज नाही.सदर मार्गाची दुरुस्ती झाली नाही अशी ओरड जागृत नागरिकांकडून होत आहे. सदर रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून नविन रस्ता तयार करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
ग्रामीण रस्त्याच्या दैनावस्थेकडे दुर्लक्ष
By admin | Published: February 25, 2016 1:44 AM