नरेश रहिले, गोंदिया : गुन्ह्यातील आरोपींची पेशी असो किंवा साक्ष पेशी असो न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. परंतु न्यायालयाने बोलावणी करूनही न्यायालयाला हुलकावणी देणाऱ्या आरोपींना तुरुंगाची हवा खावी लागते. सालेकसा न्यायालयाने समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झालेल्या आरोपींवर २६ डिसेंबर रोजी सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सालेकसा तालुक्याच्या कोटजंभुरा येथील आरोपी प्रेमदास गणेश डहारे (४२), उमेंद्रसिंग काशिराम डहारे (४५) व संतोष दयालदास डहारे (३२, तिन्ही रा. यांच्यावर अपराध क्रमांक ७९/२०२२ ला भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयाने वारंवार त्यांना समन्स बजावले; परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध सालेकसा पोलिसात भादंविच्या कलम २२९ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार कुवरलाल मानकर यांनी केली आहे. तसेच बोदलबोडी येथील राजेंद्र ताराचंद पटले (३२) याच्यावर अपराध क्रमांक ४६४/२०२३ कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो न्यायालयात हजर होत नव्हता. पठाणटोला जमाकुडो येथील महेंद्र घनश्याम औरासे (२७) याच्यावर सन अपराध क्रमांक ३५/ २०१८ मध्ये ३५४, ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तो सुद्धा पेशीवर हजर होत नसल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालेकसा तालुक्याच्या भारतीय वनविभागांतर्गत अपराध क्रमांक ६८,२०२२ मध्ये दाखल असलेल्या कलम १९०, २०० अंतर्गत आरोपीला वारंवार समन्स देऊनही आरोपी शेषराव कवडू रतोने (४७, रा. मिरीया, ता. लांजी, जि. बालाघाट) हा हजर होत नसल्याने त्याच्याविरुद्ध सालेकसा पोलिसांत भादंविच्या कलम २२९ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक जांभूळकर करीत आहेत.