पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा, रेंगेपार, घटेगाव, खोडशिवनी, बकीटोला, गोंगले या वन व महसूल विभागाच्या नाल्यामध्ये रेतीची साठवण झाली आहे. या रेतीची रेतीमाफिया रात्रंदिवस उत्खनन करीत आहे. मात्र, वन किंवा महसूल विभागाने याप्रकरणी कुठलीच कारवाई केली नाही. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे.
सध्या प्रत्येक गावागावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची कामे सुरू आहे. या लाभार्थींना अवैध रेतीमाफिया अधिक भावाने रेतीची विक्री करीत आहे. रेतीची रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू असल्याने या परिसरातील रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराची तक्रार उपवन संरक्षण अधिकारी गोंदिया व तहसील कार्यालय सडक-अर्जुनी येथील तहसीलदार यांच्याकडे केली. मात्र, अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांढरी परिसरातील या रेती घाटांवर धडक देऊन रेती तस्करीला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.