सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील काही रेती घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात सडक-अर्जुनी तालुक्यातील राका व पिपरी या रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. मात्र या रेती घाटावरून नियमांना तिलांजली देत रेतीचा अवैधरित्या उपसा करून वाहतूक होत आहे. मात्र याकडे महसूल विभागाची पूर्णपणे डोळेझाक झाली असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे.
शासन निर्णयानुसार नदीपात्रातील ज्या गटाचा लिलाव झाला, त्या गटामधून सरळ रेतीची उचल करून वाहतूक परवाना देऊन रेतीची वाहतूक करणे बंधनकारक आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील राका व पिपरी या दोन्ही घाटांचे लिलाव झाले नसताना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती तस्करी केली जात आहे. विशेष म्हणजे या घाटावरून रात्रीच्या वेळीही वाहतूक केली जात आहे. मात्र महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी हा प्रकार अंधळ्या डोळ्याने बघत आहेत. एकंदरीत या प्रकाराला महसूल विभागासह जिल्हा प्रशासनाचेच अभय असल्याने नियमांना तिलांजली देत, घाटावरून रेतीचा उपसा होत आहे. या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे.
........
बैलबंडी रेतीची वाहतूक
ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक तालुक्यात सुरू आहे. मात्र घराचे बांधकाम व इतर महत्त्वपूर्ण बांधकामाच्या नावावर तालुक्यात विविध घाटातून जवळपास २५० ते ३०० बैलबंडी मालकांना दिवसभर रेतीची वाहतूक सुरू असते. यामुळे बैलबंडी मालकांना आता सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.