..
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून कोणतेही अधिकारी व कर्मचारी ग्रामीण भागात फिरताना दिसत नाही. याचाच फायदा घेत तालुक्यातील बटाणा, मुंडीपार, अंभोरा घाटावरुन अवैध रेती चोरीला उधाण आले असून त्यात रेती माफियांचे चांगलेच फावले असून रेती तस्करीला उधाण आले आहे.
गोंदिया तालुक्याची जीवनदायनी म्हणून पांगोली नदीची ओळख आहे. ही नदी जवळच्या बटाना, मुंडीपार व अंभोरा गावाजवळून वाहते. मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक झालेली आहे. सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे ही रेती चोरट्या मार्गाने या गावातील ट्रॅक्टर मालक वाहतूक करीत आहेत. सध्या कोरोना काळ असल्यामुळे महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी या भागात फिरकत नाही.
याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात ही चोरटी रेती वाहतूक अधिकच जोमाने सुरू असते. या अवैध रेती चोरांनी नदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते तयार करुन बिनधास्तपणे रेती चोरी करीत असून त्याची चढ्या दराने विक्री करीत आहे. अनेकांनी तर रेतीची मोठी साठवणूक केल्याची माहिती सुद्धा उघड झाली आहे. या अवैध रेती वाहतुकीची माहिती पोलीस विभागाला सुद्धा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळून अवैध रेती चोरीला लगाम लावण्याची मागणी बटाना, मुंडीपार व आंभोरा येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.