गोंदिया : बेकायदेशिररित्या गाव पंचायत घेवून तसेच अंधश्रध्देला खतपाणी घालत गाव पंचायतीने एका शेतकऱ्याला २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आणि पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर आमगाव पोलिसांनी एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बेकायदेशिरपणे गाव पंचायत घेण्याचा निर्णय चांगलाच भोवला आहे.
आमगाव तालुक्यातील सितेपार येथील शेतकरी टिकाराम पारधी यांची शेती असून शेतीच्या जेसीबीने सपाटीकरणाचे काम करीत असताना त्यांच्या शेतातून भिवसन नावाचा देव असलेला दगड पारधी यांनी काढून धुऱ्यावर ठेवला. ही बाब गावकऱ्यांना माहिती होताच काम बंद करुन तू आमच्या देवाचा अपमान केलास असे बोलून १२ जून रोजी गाव पंचायत बोलविण्यात आली. या पंचायतीला सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक असे जवळपास दीडशे नागरिक उपस्थित होते. पंचांनी २१ हजार रुपयाचा दंड भरावा लागेल व दंड न भरल्यास गावातून बहिष्कृत करण्यात येईल असे सांगण्यात आले. बेकायदेशीर गाव पंचायतीच्या माध्यमातून दंड ठोठावणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंनिसने जिल्हाधिकारी व आमगाव पोलीस स्टेशनला केली. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता अखेर टिकाराम पारधी यांनी १७ जूनला तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पुरणलाल बिसेन, पोलीस पाटील उल्हासराव बिसेन, योगेश बिसेन, यादोराव बिसेन, प्रताप बिसेन, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र बिसेन, सरपंच गोपाल मेश्राम, सुधीर बिसेन, टेकचंद मडावी या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे व कॉन्स्टेबल बलराज लांजेवार करीत आहेत.