गोंदिया : चंद्रपूर जिल्ह्यातील गाव पंचायतीचा प्रकार ताजा असतानाच जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सितेपार येथे असाच एक प्रकार समोर आला आहे. शेतात नांगरणी करताना एक दगड आढळले त्याला देवाचे स्वरुप देत गाव पंचायत बोलावून शेतकऱ्यावर २१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.१६) उघडकीस आली. याप्रकरणी आता शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन संबंधितावर आमगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकविसाव्या शतकात सुद्धा लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचा प्रकार आमगाव तालुक्यातील सितेपार गावात उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार टिकाराम पारधी यांची दोन एकर शेती असून शेतीच्या कामानिमित्त नांगरणी करण्यासाठी शेतात गेला असता, त्या नागरणीत एक दगडाची मूर्ती दिसून आली. याची माहिती शेतकऱ्याने गावकऱ्यांना दिली. ग्रामवासीयांनी आक्षेप घेवून गावातील कुलदैवत असून दरवर्षी पूजापाठ केली जाते. तू ती मूर्ती काढून गावातील लोकांच्या भावना दुखावल्याच्या सांगितले. दरम्यान या प्रकरणा विरोधात गावात १२ जून रोजी पंचायत भरविण्यात आली. या पंचायतीत ग्रामवासीयांनी तोडलेले दगड व त्याचे बांधकाम पूर्ण करुन देण्याची मागणी केली. यावेळी गावातील नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. परंतु पंचायतीने झालेला प्रकार चुकीचा असून त्या शेतकऱ्यावर २१ हजार रुपयाचा दंड ठोठावला. या गरीब शेतकऱ्याला झालेली चूक मान्य नसतानाही हा दंड कसा भरावा, हे मान्य नसल्याने त्यांनी याची पोलिसात तक्रार दाखल केली.
कोट.....
ही गावातील खूप जुनी देवाची मूर्ती असून या मूर्तीची पूजा करुन शेतीच्या कामाला गावातील लोक सुरुवात करीत असत. ही जुनी परंपरा असून पारधी यांनी ओट्यावरील मूर्तीचे बांधकाम तोडल्यामुळे पूजाऱ्याने व लोकांनी बांधकाम खर्च म्हणून २१ हजार द्यावे असे पंचायतमध्ये ठरले, परंतु अजून रुपये दिलेले नाहीत. ही रक्कम दंड नसून बांधकामाचा खर्च आहे.
- गोपाल मेश्राम, सरपंच
कोट.....
सितेपार येथील घटनेसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पत्र आलेले आहे. तसेच गुरुवारी याची तक्रार सुध्दा प्राप्त झाली आहे. त्यानुसार चौकशी सुरु आहे.
- विलास नाळे, पोलीस निरीक्षक
.......
तक्रारीवरुन गुन्हा दाखल
ग्राम सितेपार येथे घडलेल्या या प्रकरणात फिर्यादी टिकाराम पारधी यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी गुरुवारी (दि.१७) भादंवी कलम १४३, ३४१, ५०४, ५०६ सहकलम ५, ६,७ सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
.......अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
सितेपार येथील घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळताच त्यांनी याप्रकरणाची गांर्भियाने दखल घेतली आहे. तसेच याप्रकणी योग्य कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुध्दा पत्र दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीनच वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान याप्रकरणी आता नेमकी कुणावर कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.