लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची समस्या कायम आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुख्य मार्ग १५ डिसेंबरपर्यत खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटील यांची घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री ९.३० वाजेपर्यंत या मार्गावर रहदारी सुरू असते. अर्जुनी ते चांदोरी खुर्द ९ कि.मी. अंतराचा मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता पूर्णत: उखडला असल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर या मार्गावर अपघात होवून काही वाहन चालकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती. मागील दोन वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सावरा येथे २ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण त्याही रस्त्याचे तिनतेरा वाजले आहे. या रस्त्याने रेतीघाट असल्याने ट्रकची मोठी वर्दळ असते. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. अशातच रस्ता उखडल्याने वाहन कोणत्या बाजूने न्यावे असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. हा परिसर तालुक्याचा शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आले होते. मात्र ते देखील सध्या अर्धवट असल्याचे चित्र आहे.अर्जुनी ते चांदोरी, बिहिरीया, इंदोरा बुज. मार्गाचे सर्व्हेक्षण नियोजनात असल्याचे २० वर्षापासून अधिकारी सांगतात. मात्र अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे कायम आहेत.
अर्जुनी चांदोरी खुर्द मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 9:59 PM
तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देनव्याने डांबरीकरणाची मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष