अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी (दि.६) जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर सर्वच क्षेत्रांतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत, तर काही जण नाराज असूनदेखील उघड बंडखोरी न करता पक्षात राहूनच ती निवडणुकीदरम्यान काय करायचे आहे हे ठरविले आहे. त्यामुळे उघड बंडखोरीचे ठीक, पण ही अंतर्गत बंडखोरी सर्वच पक्षांसाठी चांगलीच डोकेदुखीची ठरणार आहे. यावर सर्वच पक्षांनी वेळीच उपचार न केल्यास पक्षांचा आजार वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सर्वच पक्षांनी सूर आळवला, त्यामुळे अद्यापही या निवडणुकीत युती किंवा आघाडी झाली नाही. त्यामुळे या निवडणुका स्वतंत्र लढल्या जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी न झाल्याने त्याचा फायदा नेमका कुणाला होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ज्यांना ही महाविकास आघाडी नको होती ते मात्र मनातल्या मनात खुश होऊन जिल्हा परिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा रोवण्याचे स्वप्न रंगवीत आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी तिकीट वाटपांवरून चांगलीच खदखद आहे. पक्षाने ज्यांना मागील दोन-तीन वर्षांपासून या निवडणुकांमध्ये तुमचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन दिले होते. त्यांचा मात्र तिकीट वाटताना साधा विचारही झाला नाही. अनेक नवख्या आणि चर्चेत नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. काहींनी ते उघडपणे बोलून दाखविले. काहींनी या विरोधात उघडपणे बंड न करता पक्षात राहूनच निवडणुकीत पक्षाला कसे नुकसान पाेहोचवायचे हे ठरविले आहे. त्यामुळे ही बाब सर्वच पक्षांसाठी घातक ठरणार असून निवडणुकीचे समीकरण बिघडविणारी आहे. पक्षांचे वरिष्ठ नेते असंतुष्टांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांची ही ‘समझोता एक्स्प्रेस’ कितपत यशस्वी होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘चावी कुणाला भरणार, की काटे फिरविणार’ n जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह गोंदिया विधानसभेच्या स्थानिक आमदारांच्या चावी संघटनेने सर्वच जागा लढविण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील विजयाचे समीकरण बदलणार आहे. ‘चावी कुणाला भरणार, की काटे फिरविणार’ याची सध्या मतदारांमध्ये चर्चा आहे.
‘हम से का भूल हुयी, जो ये सजा हमका मिली...’ - पक्षाने आजवर केवळ ज्यांना आश्वासन दिले, पण तिकीट वाटप करताना त्यांना विचारातही घेतले नाही. अशांची संख्या सर्वच पक्षात डझनावर आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ‘हम से क्या भूल हुयी जो ये सजा हमका मिली’ असे विचारत आहेत. नेतेमंडळी यालाच राजकारण म्हणत असल्याचे सांगत त्यांची समजूत काढत आहेत.
आज हाेणार जम्बो अर्ज दाखल - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आतापर्यंत १६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर सोमवारी (दि.६) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी चारशेवर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक यंत्रणेवरील ऑनलाइन ताण वाढण्याची शक्यता आहे.