लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन नदी-नाल्यांत केले जात असून त्यामुळे पाणी प्रदूषण होते. अशात पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून कृत्रिम जलकुंड तयार करून त्यात गणरायाचे विसर्जन करण्यात यावे असे शासनाकडून सांगितले जाते. त्यानुसार, येथील लायन्स क्लबकडून शहरात दोन ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केले जाणार असून त्यात गणरायाचे विसर्जन करण्याची सोय शहरवासीयांना उपलब्ध होणार आहे.
कान्होबा, गणपती, दुर्गा, शारदा मातेचे विसर्जन नदी-नाल्यांमध्ये केले जाते. मूर्ती विसर्जन करीत असतानाच त्यांचे निर्माल्यसुद्धा नदी-नाल्यांत टाकून दिले जाते. अशात जल प्रदूषित होते. दुर्गा-शारदा मातेच्या मूर्ती मोठ्या राहत असल्याने त्यांचे विसर्जन कृत्रिम जलकुंडात करणे शक्य नाही. मात्र गणरायाच्या घरगुती मूर्ती तसेच मध्यम आकाराच्या मूर्ती जलकुंडात विसर्जित होऊ शकतात. शिवाय, गणपतीची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने गणरायाचे विसर्जन जलकुंडात करण्याबाबत शासनाकडूनही जोर दिला जातो. शिवाय, स्थानिक प्रशासनाला तशा सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या सूचना दिल्या जातात.
त्यानुसार, बहुतांश शहरांमध्ये नगर परिषद किवा महानगर पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करून शहरवासीयांच्या घरातील गणरायाचे विसर्जन केले जाते. येथे मात्र लायन्स क्लबकडून दरवर्षी कृत्रिम जलकुंड तयार केले जात असून यंदाही लायन्स क्लबनेच यासाठी पुढाकार घेतला आहे. तर नगर परिषद केवळ आपले काही कर्मचारी विसर्जनासाठी देणार असून एवढेच सहकार्य करणार असल्याची माहिती आहे.
नगर परिषदेची उदासीनता शहरात ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करून नगर परिषदेने गणरायाच्या विसर्जनाची सोय शहरवासीयांना उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र नगर परिषद याबाबत उदासीन दिसून येत आहे. लायन्स क्लबच्या जलकुंडात आपले कर्मचारी देऊन नगर परिषद धन्यता मानत आहे. या कार्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेणे अपेक्षित असतानाच सामाजिक संस्थांना पुढे यावे लागत आहे ही शोकांतिकाच आहे.
येथे राहणार कृत्रिम जलकुंड लायन्स क्लबकडून यंदा सुभाष बागेत तसेच नगर परिषद कार्यालयालगत हिंदी टाऊन स्कूलमध्ये जलकुंड तयार केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन जलकुंडांमध्ये शहरवासीयांना गणरायाचे विसर्जन करता येणार आहे. विशेष म्हणजे, शहरात हजारावर घरांमध्ये गणरायांची स्थापना केली जाते. अशात हे फक्त दोन जलकुंड तयार केले जात आहेत. त्यातही पुलापलीकडील नागरिकांसाठी एकही जलकुंड नसल्याने त्यांना नदी-नाले, विहीर यामध्येच गणरायाचे विसर्जन करावे लागणार आहे.