काँग्रेसमध्ये दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये यासाठी चढाओढ सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:56 PM2024-10-17T15:56:20+5:302024-10-17T15:57:26+5:30
सर्वाधिक स्पर्धा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात : पक्षश्रेष्ठींचा वाढला ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा उमेदवारीकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांपैकी सर्वाधिक स्पर्धा अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहे. येथे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या १७ वर असून, स्पर्धेतील दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे येथे उमेदवारीपेक्षा दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये यासाठी सर्वाधिक चढाओढ पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघ कुणाच्या वाट्याला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यातच मंगळवारी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे गेल्याची यादी व्हायरल झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांचे चेहरे काहीसे पडले होते. या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या १७ वर आहे.
या सर्वांनीच गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघात मोर्चेबांधणी करून आपली उमेदवारी पक्की असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांनी कुणालाच नाराज करायचे नाही, असे ठरवून सर्वच इच्छुकांना तयारीला लागा, सव्र्व्हेत काय होते पाहू, असे सांगितले. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी मतदारसंघात सक्रिय होत सभा, मेळावे आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. तर काँग्रेसचे जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेते अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार आधीच ठरला आहे. तो मतदारसंघातील असेल की बाहेरचा हे आम्ही नंतर सांगू असे सांगितले. तर स्पर्धेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी एकदाचा मतदारसंघातील चालेल; पण, बाहेरचा उमेदवार लादू नका, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडल्याची माहिती आहे. पण, काँग्रेसच्या नेत्यांनी कहीं पे निगाहे कहीं पे निशाना असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे इच्छुकांचीसुद्धा थोडी धाकधूक वाढली आहे.
१५ सदस्यीय मंडळ घेणार आढावा
अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे राहावा, अशी या पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासाठी शिष्टमंडळाने दोनदा पक्षाचे नेते खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता या पक्षाचे १५ सदस्यीय मंडळ या मतदारसंघाला लवकरच भेट देऊन आढावा घेणार आहे. त्यानंतरच या मतदारसंघाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
महायुतीचे वेट अॅण्ड वॉच
महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असल्याची माहिती आहे. पण, तरीही भाजपने या मतदारसंघावरील दावा अद्यापही सोडलेला नाही. माजी मंत्र्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरू ठेवल्या आहेत. पण, उघडपणे यावर कुणीच बोलत नसून सर्वच जण वेट अॅण्ड वॉच करीत असल्याचे चित्र आहे.