गोंदिया : इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम अंतर्गत तत्काळ पोलीस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल ११२ योजना जिल्ह्यातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.विशेष म्हणजे लोकांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा नियोजन व विकास निधीतून ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून पोलीस ठाण्यांसाठी ४० बोलेरो आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी ६ स्कॉर्पिओ खरेदी करण्यात आल्या होत्या. ही वाहने थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडलेली असतात, जिथे जीपीएस वाहनांची जागा कळते. या डायल ११२ ने गोंदिया जिल्ए्यातील २०१७ महिलांचे संरक्षण केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण आल्यास ११२ हा फक्त एक नंबर डायल केल्यावर ई-मेल व मोबाईल अप्लिकेशनद्वारे नियंत्रण कक्षात संदेश येताच तत्काळ पोलीस मदत करतात. कर्मचारी पाठवले जातात, त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला ४६ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याद्वारे २४ तास ही आपत्कालीन सेवा दिली जाते.
११२ डायल केला; पोलिसांनी हाताळले ६७३९ प्रकरणेमारामारी, रस्ता अपघात, हल्ला, गोळीबार, खून, अपहरण, दरोडा, चोरी, महिलांवरील गुन्हे आदींसंबंधीचा संदेश येताच पिडितेच्या मदतीसाठी पोलीस कर्मचारी तातडीने पाठविले जातात.
२८ सप्टेंबर २०२१ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ८२४२ कॉल्स आले आहेत. यात २०१७ कॉल महिलांवरील गुन्ह्याशी संबंधित आहेत. ५० कॉल मुलांच्या संबंधित आहेत. मृतदेह आढळल्याचे ३१ कॉल आले, बेपत्ता झाल्याच्या ६९ तक्रारी तर ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित २८६ तक्रारीं आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रस्ता अपघातात जखमींना वेळीच रुग्णालयात नेल्याने ४५३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. गुरांच्या तस्करीच्या ३९ तक्रारी प्राप्त झाल्या.
२४ तास सेवाडायल ११२ अंतर्गत २४ तास आपत्कालीन सेवा प्रदान केली जाते. यासाठी जिल्हा स्तरावर एक समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक स्तरावरील अधिकारी आणि जवान, एक पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वाहनांमध्ये पोलीस कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिफ्टनुसार चालक तैनात करण्यात येतात.
फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई
डायल ११२ योजना गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तुम्ही कधी अडचणीत सापडलात तर ११२ वर डायल करा, तुम्हाला लगेच पोलिसांची मदत मिळेल. पण या ठिकाणी फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो. डायल ११२ वर ११० वेळा खोटे कॉल करून खोटी माहिती दिल्याच्या पुष्टीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी महालगाव येथील आरोपी महिलेच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तिला ६ महिने कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पोलिसांना त्रास देण्यासाठी फेक कॉल करू नका.