गोंदिया : गुन्हा दाखल न करण्यासाठी ट्रॅक्टर चालकाला लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहर पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी (दि.२६) दुपारी २ वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यातच करण्यात आली. अनिल फागुजी पारधी (५४, रा. श्रीनगर) असे लाचखोर सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार (४०, रा. नंगपुरा, मुर्री) हा ट्रॅक्टर चालक असून त्याच्या विरोधात शुक्रवारी (दि.२४) शहर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी, तसेच तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात समझोता करून दिल्याचा मोबदला म्हणून अनिल पारधी याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे शनिवारी (दि.२५) तक्रार नोंदविली होती.
तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली असता अनिल पारधी याने पंचासमक्ष तडजोडीअंती आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार, पथकाने रविवारी (दि.२६) दुपारी २ वाजेच्या सुमाास सापळा लावला व अनिल पारधी याला शहर पोलिस ठाणे परिसरात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उप अधीक्षक विलास काळे, पोनि अतुल तवाडे, स.फौ. चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, काटकर, नापोशि रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.