मध्यप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील हालचालींवर लक्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:06 PM2023-11-15T15:06:57+5:302023-11-15T15:08:35+5:30
पोलिसांकडून ठिकठिकाणी केली जातेय तपासणी : वाहनांवर करडी नजर
गोंदिया : लगतच्या मध्यप्रदेशात येत्या १७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. यादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागात कडक पोलिस बंदाेबस्त लावला आहे. तसेच सीमावर्ती भागात तपासणी नाके तयार करण्यात आले असून या नाक्यावर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे.
आमगावपासून मध्यप्रदेशाची सीमा केवळ पाच किमी अंतरावर आहे. या भागातील नागरिकांची मध्यप्रदेशातील लांजी परिसरात ये-जा सुरू असते. तसेच गोंदिया आणि आमगाव येथून लांजीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स सुद्धा जातात. निवडणुकीदरम्यान रोखड वाहून नेली जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बाघ नदीजवळ मध्यप्रदेशच्या सीमेजवळ तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा याठिकाणी चौकी तयार केली आहे. दोन्हीकडून येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची या नाक्यावर तपासणी करून पुढे पाठविले जात आहे. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत.
आमगावजवळ मध्यप्रदेशच्या लांजी पोलिसांनी नाका तयार केला असून याठिकाणी पोलिसांसह महसूल व वनविभागाचे कर्मचारी सुद्धा कर्तव्य बजावत आहेत. निवडणुकी दरम्यान रोख रक्कम आणि दारूची वाहतूक होत असते. या प्रकाराला पायबंद लावण्यासाठीच ही उपाययोजना केली जात आहे. या तपासणी नाक्यावर तीन पाळीत कर्मचाऱ्यांची पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांवर नजर
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान देखील दक्ष झाले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिस कर्मचारी संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवून आहे. एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची पोलिस कर्मचारी कसून चाैकशी करीत आहेत.
जिल्ह्यातील नेते प्रचारासाठी मध्यप्रदेशात
लगतच्या मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा गेले असल्याची माहिती आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागून असल्याने जिल्ह्यातील नेत्यांचा सुध्दा सातत्याने संपर्क येतो.