गोंदिया : जिल्हा न्यायालयात ई-सेवा केंद्राचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे ई-सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. ई-सेवा केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ सर्व पक्षकार व वकील वर्गाने घ्यावा, असे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी सांगितले. ई-सेवा केंद्रामध्ये न्यायालयीन प्रकरणाची स्थिती, पुढील सुनावणीची तारीख व इतर चौकशीची माहिती देणे, प्रमाणित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, प्रकरण दाखल करणे, हार्डकॉपी प्रकरण स्कॅन करणे, ई-मुद्रांक ऑनलाईन खरेदीसाठी गर्दी करणे, ई-कोर्टाचे मोबाईल मॅप डाऊनलोड करण्यास मदत करणे, तुरुंगात नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत योगची सुविधा करणे, न्यायाधीशांच्या रजेसंदर्भात माहिती, विशिष्ट न्यायालयाच्या स्थानाविषयी, प्रकरणाची माहिती पुरविणे, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधिसेवा समिती व सर्वोच्च न्यायालय विधिसेवा समितीकडून विनामूल्य कायदेशीर सेवा कशा मिळवाव्यात, याबद्दल लोकांना मार्गदर्शन पुरविणे, ई-कोर्टअंतर्गत येणाऱ्या इतर सर्व डिजिटल सुविधा याबद्दल माहिती पुरविणे, हे कार्य ई-सेवामार्फत होणार असल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी दिली.
यावेळी जिल्हा न्यायाधीश उदय शुक्ल, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी. कटरे, जिल्हा न्यायाधीश-२ एस.व्ही. पराते, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव एम.बी. दुधे, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जी. भट्टाचार्य, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर जे.एम. चव्हाण, आर.डी. पुनसे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व्ही.आर. आसुदानी, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व्ही.आर मालोदे, पी.सी. बच्छले, व्ही.के. पुरी, जिल्हा वकील संघाचे सचिन बोरकर, ॲड. ओम मेठी, ॲड. जाॅनी, ॲड. टी.टी. कटरे, ॲड. बाजपेयी, ॲड. शबाना अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एन.आर. ढोके, तर आभार सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एन.आर. वानखडे यांनी मानले.