लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डोंगरगाव अंतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन व्यवस्थापक मनोज गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनलाल परशुरामकर, लिपिक पिसदे, नितूसिंग परिहार, माजी सरपंच आनंद इळपाते, विश्वनाथ खंडाते, पोलीस पाटील मोहनलाल बोरकर, मनोहर टेकाम व कास्तकार उपस्थित होते. या परिसरात उन्हाळी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्राची नितांत आवश्यकता असताना ते सुरुही करण्यात आले. याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. धानाची कापणी व मळणी यंत्राद्वारे होत असल्याने एका दिवसातच शेतकरी मोकळा होतो. तसेच धार खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याने आधारभूत किंमतीत धान विकणे सोईस्कर झाले आहे. सध्या उन्हाळी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असून सदर हमीभाव खरेदी केंद्रामुळे आपले पीक विकणे शेतकऱ्यांना सुलभ झाले आहे.शासनाने मागील वर्षी उन्हाळी धानाला आधारभूत किमतीसोबतच प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिले होते. मात्र यावर्षी राज्य शासनाकडून धानाला बोनस देण्याचे जाहीर झाले नाही. याचा परिणाम धान खरेदीवर नक्कीच होईल, अशी प्रतिक्रीया उद्घाटनाप्रसंगी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
By admin | Published: May 24, 2017 1:44 AM