गोंदिया : गोंदिया नगर परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प शुक्रवारी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी ऑनलाईन सादर केला. या अर्थसंकल्पात नगर परिषदेला विविध स्रोतांच्या माध्यमातून २०३ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. तर याच उत्पन्नाच्या आधारावर नगर परिषदेने २२३ कोटी २८ लाख ७६ हजार २०१ रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. प्राप्त होणाऱ्या उत्पन्नापेक्षा नगर परिषदेने १९ कोटी ६२ लाख ९५ हजार रुपयांच्या अधिकच्या खर्चाचा अर्थसंकल्प पारित केला आहे. त्यामुळे नगर परिषदेला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सन २०२१-२२ या वर्षाचा संकल्प कोविड नियमांचे पालन करून ऑनलाइन सादर करण्यात आला. सभागृहात नगराध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याधिकारी करण चव्हाण, सर्व सभापती आणि गटनेते उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्ष इंगळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात गोंदिया नगर परिषदेला २२३ कोटी ३८ लाख १९ हजार ३८२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. यामध्ये प्रारंभी शिल्लक १९ काेटी ७२ लाख ३८ हजार ७२६ रुपये आणि निव्वळ उत्पन्न २०३ कोटी ६५ लाख ८० हजार ६५५ रुपये एवढे आहे. या उत्पन्नावर नगर परिषदेने २२३ कोटी २८ लाख ७६ हजार २०१ रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. या अर्थसंकल्पात शहरात दवाखाने निर्माण करणे, प्रशासकीय इमारत, दुकान गाळे, बाजार परिसरात सुविधा आणि उद्यान निर्मितीवर भर देण्यात आला आहे. अंदाजित उत्पन्नापेक्षा १९ कोटी ६२ लाख ९५ हजार ५४५ रुपये अधिक खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली आहे.
......
अशी केली विविध बाबींवर खर्चाची तरतूद
- सामान्य प्रशासन विभाग ११ कोटी ५१ लाख ३ हजार रुपये
- सेवानिवृत्त विभागाकरिता १६ कोटी ८८ लाख रुपये
- अग्निशमन विभागाकरिता ९२ लाख ३५ हजार
- विद्युत व्यवस्थेकरिता २ कोटी २३ लाख रुपये
- पाणीपुरवठा विभागाकरिता ४ कोटी ३४ लाख रुपये
- स्वच्छतेकरिता १४ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपये
- बांधकाम विभागाकरिता २ कोटी ९३ लाख रुपये
- इतर खर्चाकरिता ९ कोटी २७ लाख रुपये
.................