बनगाव येथे घाणच घाण
आमगाव : शहरातील बनगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा रोड परिसरात कचराकुंडी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कचराकुंड्यांकडे दुर्लक्ष
गोरेगाव : येथील नगर पंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकांत कचराकुंड्या बसविण्यात आल्या. मात्र, या कुंड्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हा स्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. मात्र, येथे विश्रामगृह नसल्याने अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना परतावे लागते.
शेतकऱ्यांना बारदाना रकमेची प्रतीक्षा
केशोरी : धान खरेदी करताना शेतकऱ्यांचा बारदाना वापरात आणला होता; परंतु त्या बारदान्याची किंमत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही.
ऑनलाईन खरेदीला आला जोर
देवरी : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाईन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत.
रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार?
अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवस-रात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र, रानडुकरे शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
बोंडगावदेवी : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे.
माकडांचा येरंडीत वास
बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे मागील महिनाभरापासून जंगलातील माकडांचा शिरकाव झाला असून, यामुळे गावकरी वैतागले आहेत.
टिल्लू पंपमुळे पाणी मिळणे झाले कठीण
आमगाव : स्थानिक नगरपरिषद प्रभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेवर काही व्यक्ती टिल्लू पंप लावून पाणी खेचत आहेत. त्यामुळे इतर ग्राहकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. मात्र, टिल्लू पंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांची समस्या कायम आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावांत व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण येत आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावांत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावांत व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत. मात्र, भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.