बनगाव येथे घाणच घाण
आमगाव : शहरातील बनगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा रोड परिसरात कचराकुंडी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कचराकुंड्यांकडे दुर्लक्ष
गोरेगाव : येथील नगर पंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकात कचराकुंड्या बसविण्यात आल्या. मात्र, या कुंड्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
शेतकऱ्यांना बारदाना रकमेची प्रतीक्षा
केशोरी : धान खरेदी करताना शेतकऱ्यांचा बारदाना वापरात आणला होता. परंतु, त्या बारदान्याची किंमत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. बारदाना रक्कम त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हा स्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. मात्र, येथे विश्रामगृह नसल्याने अधिकारी तसेच जनप्रतिनिधींना परतावे लागते. याकरिता येथे विश्रामगृह तयार करण्याची मागणी केली जात आहे.
माकडांचा येरंडीत वास
बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे मागील महिनाभरापासून जंगलातील माकडांचा शिरकाव झाला असून, यामुळे गावकरी वैतागले आहेत. माकडे गाव सोडत नसल्याने आता ही माकडे येरंडी-देवलगावची रहिवासी झाल्यासारखे वाटत आहे.
ऑनलाईन खरेदीला आला जोर
देवरी : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाईन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत.
रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार
अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवस-रात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र, रानडुक्कर शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
देवरी : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले असून, अनेकांनी नवीन कंपनीच्या सीमकार्ड खरेदीला पसंती दिली आहे.
बैलबाजाराकडे पाठ
गोंदिया : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी खरेदीदारच मिळत नसल्याने हे बाजार ओस पडले आहेत.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
तिरोडा : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत आहे. शासनाच्या आदेशालाही यामुळे तिलांजली मिळत आहे. राज्य शासनाने प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.