आमगाव : रुग्ण संख्येत घट हाेत असल्याने आमगाव शहर आणि तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या कोरोना बाधित रुग्ण संख्या एक आहे. यामुळे अधिक खबरदारी घेऊन कोरोनाला आमगावातून हद्दपार करता येऊ शकते. मात्र,नेमके याच काळात तब्बल ८० टक्के आमगावातील नागरिक शहरात विनामास्कने घराबाहेर पडतात.
केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, भाजीपाला मार्केटमध्ये अनेक व्यावसायिक-विक्रेत्यांच्या तोंडावरील मास्क गायब झाले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग तर नावाला देखील पाळले जात नाही. कुठल्याही दुकानात खबरदारी घेतली जात नाही. कृष्ण जन्माष्टमी व गणेशोत्सवाच्या तोंडावर हा बेजबाबदारपणा शहराला पुन्हा कोरोनाच्या खाईत लोटणारा ठरू शकतो. शहरातील कापड दुकान, ज्वेलरी शॉप, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, बर्तन दुकानात अतोनात गर्दी दिसून येत आहे. हीच गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. संभाव्य धाेका टाळायचा असेल तर काेराेना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे ठरेल.
.............
आगामी सणावारात काळजी घेणे गरजेचे
आगामी दिवसात महत्त्वाचे सणवार सुरू हाेत आहे. दुसरीकडे तज्ज्ञांनी काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काेराेनाला हरवण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरावा. फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हात स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार धुवावे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.
............
प्रशासकीय पातळीवर गांभीर्य नाही
कोविड नियमांचे पालन व्हावे या साठी प्रशासकीय पातळीवर गांभीर्य नाही. नगर परिषद प्रशासन कुठल्याही दुकानदारावर कारवाई करताना दिसून येत नाही. विनामास्कने फिरणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दंड केला जात नाही. त्यामुळे नागरिक निर्भीडपणे फिरताना दिसत आहेत.
............
व्यावसायिकांचे नियम पायदळी तुडवणे
दुकानदारांची आर्थिक स्थिती लॉकडाऊनमध्ये मंदावली. त्यामुळे अनलॉक काळात आर्थिक स्थिती गतिमान होण्यासाठी नियम पायदळी तुडवित व्यवसाय करतांना दिसून येत आहेत. कुठल्याही दुकानात सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाहीत.