आमगाव : येथील रण चौक ते किडांगीपर रस्ता हा पंचायत समितीकडे जाणारा मुख्य रस्ता असून कंत्राटदाराने बांधकाम साहित्य व मलबा टाकल्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
शहरात सध्या सिमेंट रस्त्याचे व रस्त्याच्या कडेला नालीचे बांधकाम सुरू आहे. शहरातील रण चौक पासून किडांगीपार जाणारा एकमेव रस्ता असून या मार्गावर नालीचे बांधकाम करण्यात आले; परंतु ते बांधकाम उंच झाल्याने पुन्हा तोडफोड करून नव्याने नालीच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करताना नळाच्या पाण्याची पाइपलाइन लिकेज झाली. त्याकरिता नगर परिषदेद्वारा खड्डा खोदण्यात आला. या सर्व प्रकरणात जवळपास १ महिन्याचा कालावधी लोटूनही बांधकाम साहित्य व पाइप रस्त्यावर पडून आहेत. नगर परिषद व कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे रस्ता जवळपास १ महिन्यापासून बंद आहे.
या मार्गावर पंचायत समिती, भाजीपाला बाजार, आदर्श ज्युनिअर कॉलेज, कृषी उत्पन्न बाजार समिती व मोठी दुकाने असल्याने याच मार्गावरून नागरिकांना जावे लागते. दुसऱ्या मार्गाने जाण्यास अंतर जास्त पडते म्हणून लांबचा पल्ला मारून जाण्यापेक्षा या मार्गावर नेहमी वर्दळ असते. मात्र, हा मार्ग बंद असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. लवकरात लवकर नालीचे बांधकाम करून रस्ता खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.