कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा : रूग्णांना म्हणावे लागते ‘हे राम’ गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आॅर्थो (अस्थिरोग) वार्डात रूग्णांच्या उपचाराकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. एकदा लावलेले बँडेज पट्टी निघूनही रूग्णांना तीन-तीन दिवस लोटून बदलविले जात नाही. तसेच एकदा भेट दिल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी पुन्हा रुग्णाकडे ढुंकूनही पाहात नाही, अशी व्यथा काही रुग्णांना व्यक्त केली.दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हाभरात कुठेही अपघात झाला तर पुढील उपचारासाठी सरळ केटीएस जिल्हा रूग्णालयात जखमींना हलविले जाते. पण सेवेतील कमतरतेमुळे अनेकदा रूग्ण दगावतात. त्यामुळे रूग्णांचे नातलग आरोग्य सेवेबद्दल रोष व्यक्त करून हंगामा करतात. यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा जबाबदार ठरत आहे. शनिवारी सायंकाळी गोंदियावरून दासगावकडे जाणारा आॅटो उलटून पाच प्रवाशी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी केटीएस रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु येथील वैद्यकीय सेवाच वाऱ्यावर असल्यामुळे जखमींना मोठा त्रास व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.- अस्थिरोगतज्ज्ञ होतात गायबकेटीएस जिल्हा रूग्णालयात आर्थोचे तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. यात डॉ.मनोज राऊत, डॉ.दिगंबर मरस्कोल्हे व डॉ.अविनाश शेळके यांचा समावेश आहे. पूर्वी डॉ.खतवार होते, परंतु त्यांचे स्थानांतरण झाले आहे. दुपारी १२ नंतर कधीही कुणीही अस्थिरोगाचे डॉक्टर केटीएस रूग्णालयात आढळून येत नाही. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. आॅर्थो वॉर्डातील रूग्णांमध्ये कुणाचे पाय तर कुणाचे हात मोडले असते. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ते सर्व कन्हत राहतात. कुण्या वृद्धाचे हाड मोडले असते तेव्हा त्या वृद्धावर योग्य उपचार होत नसल्याने असह्य वेदना होत असतात. त्यांच्यावर या वार्डात ‘हे राम’ म्हणण्याची पाळी येतेच. पण वैद्यकीय स्टाफ कुठे असतात याबद्दल कुणालाही माहिती नसते. या प्रकाराबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परियाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईलही ‘स्वीच आॅफ’ होता.
केटीएसच्या आॅर्थो वॉर्डात गैरसोय
By admin | Published: January 12, 2016 1:32 AM