नवेगावबांध : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.
बाजारात वीज व्यवस्थेची मागणी
सइक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिंपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते, तसेच येथील वॉर्ड क्रमांक-३ सर्व जनता याच मार्गावरून ये-जा करीत असते.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
देवरी : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी त्याचप्रमाणे शासकीय कामासाठी वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत मागील ३-४ महिन्यांपासून अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
आमगाव : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजपुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली; पण याकडे दुर्लक्ष केले आहे.
राइस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहनचालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन अपघात होण्याची शक्यता असते.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. उपाययोजना करण्याची गरज आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही; पण अजूनही नगरपंचायत प्रशासनाचे नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या केरकचऱ्याने भरल्या आहेत. त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही.
कचरापेट्यांकडे दुर्लक्ष
केशोरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत परिसरात कचरा होऊन अस्वच्छता पसरू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नाही.
पानगाव- सोनपुरी- खेडेपार रस्ता खड्ड्यात
सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव- सोनपुरी- खेडेपार रस्ता मध्यप्रदेशला जोडणारा एकमेव रस्ता आहे. यंदाच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होत असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागांनी रस्त्याची दुरुस्ती केली नाही. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.