दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी करावी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.
घोगरा ते देव्हाळा मार्गावर खड्डेच खड्डे
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घोगरा ते देव्हाळा हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे. या मार्गावरून दोन्ही बाजूने शेती आहे. रस्ता पूर्णपणे उखडलेला असल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. देव्हाळा येथे पेपर मिल असल्यामुळे अनेक मजूर या कारखान्यात रात्री बेरात्री या रस्त्याने कामावर जातात. शाळकरी विद्यार्थी तुमसर येथील कॉलेजमध्ये याच मार्गाने जातात. तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घोगरामार्गे ही बससेवा सुरू होती, पण ही बससेवा रस्त्याअभावी बंद करण्यात आली. घोगरा ते देव्हाळा या गावावरून गोंदिया ते नागपूरकडे बस धावत असतात. यावेळी रेती भरलेले टिप्पर व ट्रॅक्टर या मार्गाने नेहमीच ये-जा करीत असतात. त्यामुळे या मार्गाची अधिक दुरवस्था झाली आहे. परिणामी या मार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास गावकऱ्यांना व इतर गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला. आता पुन्हा कोरोना फोफावत असून, त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अशात कामगारांच्या योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कटंगटोला मार्गावर पडले खड्डेच खड्डे
खातिया : गोंदिया तालुक्यातील चिरामनटोला ते कटंगटोला हा मार्ग पूर्णपणे उखडला असून त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
गोंदिया : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्चला पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे; पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याचप्रकारे जिल्हा पातळीवरही मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतर पहिल्याच दिवशी शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. सकाळच्या वेळी तर शहरातील बाजारपेठा व सर्वत्र गर्दीच गर्दी असे चित्र दिसून आले.
प्रवासी निवारा उभारा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते, पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीशी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांतील नागरिक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. याकरिता प्रवासी निवाऱ्याची मागणी आहे.