कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला. आता पुन्हा कोरोना फोफावत असून, त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अशात कामगारांच्या योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कटंगटोला मार्गावर पडले खड्डेच खड्डे
खातिया : गोंदिया तालुक्यातील चिरामनटोला ते कटंगटोला हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
गोंदिया : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी.पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्चला पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे; पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याचप्रकारे जिल्हा पातळीवरही मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतर पहिल्याच दिवशी शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. सकाळच्या वेळी तर शहरातील बाजारपेठा व सर्वत्र गर्दीच गर्दी असे चित्र दिसून आले.
प्रवासी निवारा उभारा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीशी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांतील नागरिक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. याकरिता प्रवासी निवाऱ्याची मागणी आहे.
घरावर टीनपत्रे टाकल्याने ठार करण्याची धमकी
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाना चौक कुंभारेनगर येथील प्रतिभा राजकुमार वाघमारे (वय ४९) यांनी आपल्या घरावर टिनाचे शेड टाकल्याने आरोपी निशा खोबरे (४५) हिने घरावर टीनपत्रे का टाकले, तुझ्याकडील पाणी आमच्याकडे पडते, असे बोलून ठार करण्याची धमकी दिली. ही घटना ९ जुलैच्या सकाळी ११ वाजता घडली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उसनवारीचे ५० हजार मागितल्याने ठार करण्याची धमकी
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रशेखर वाॅर्ड श्रीनगर येथील शीतल राकेश यादव (वय ३६) यांनी उसनवारीवर दिलेले ५० हजार रुपये परत मागितले असता आरोपी गोपी रामदास कोसरे (वय ३३), रामकली रामदास कोसरे (५०), ममता बबलू गोटे (३०, सर्व रा. कस्तुरबा वाॅर्ड, गोंदिया) यांनी पैसे न देता शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात ९ जुलै रोजी दुपारी गोंदिया शहर पोलिसांत आरोपींविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.