गोंदिया : जरी मागील १५ दिवसांपासून जिल्हा ग्रीन झोनमध्ये दिसून येत असला तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही. आता सणासुदीचे दिवस असून नागरिक बिनधास्तपणे नियमांना डावलून गर्दी करीत आहेत. हा प्रकार चांगला नसून महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्ससुद्धा कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास सांगत आहे. करिता कोविड स्क्रीनिंग चाचण्या वाढवा, असे निर्देश येथील केटीएस रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.
सध्या गणपती व महालक्ष्मी आदी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळलेली असल्याने तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मंदिरापेक्षा आरोग्य मंदिरे उभारा, असा संदेश देत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सतत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलेला आहे. तरीही गोंदियावासी अत्यंत बेफिकीर होऊन निर्धास्त गर्दी करीत आहेत. त्यात मास्कचा अभाव, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. यावरुन अशी ही बेशिस्त कोविडच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रणच आहे.
विशेष म्हणजे, तालुका मागील कोविड लाटेत सर्वात जास्त हॉटस्पॉट ठरला होता. शहरातून देखील रेकार्डब्रेक कोविड रुग्णांचा विस्फोट झाला होता. तरीही तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करताना सप्टेंबर महिन्यातील या १० दिवसांत कोविड चाचण्यांची संख्या अत्यंत अल्प असून ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे. शनिवारी (दि.११) जिल्ह्यातील १० ग्रामीण रुग्णालयातून रॅपिड फक्त ९३ कोविड स्क्रीनिंग तपासण्या केल्या गेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातून एकही स्क्रीनिंग केलेली नाही. तसेच १४ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातून मागील २४ तासांत फक्त २०७ आरटीपीसीआर तपासणी सॅम्पल्स मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत प्राप्त झाले आहेत. ही बाब गंभीर असून कोविड स्क्रीनिंग चाचण्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.