बाराभाटी : येथून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या येरंडी ते डोंगरगाव या डांबरी रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहते. यामुळे कित्येकदा हा रस्ता बंद पडतो व शेतकऱ्यांना, तसेच अन्य प्रवाशांना ये-जा करताना अडचण होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम केलेच नाही. करिता येरंडी ते डोंगरगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
हा रस्ता अनेक दिवसांपासून बनला असून, पूल मात्र तसाच ठेवण्यात आला. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. यामुळे शेतकऱ्यांना डोंगरगाव व कवठा या शेतशिवारात त्यांना जाता येत नाही, तसेच या मार्गावरून शाळेत जाणारी मानव विकासची बस हीसुद्धा बंद करावी लागते. यापूर्वी झालेल्या कामात कंत्राटदाराने फक्त मोठे पोंगे टाकून काम केले; पण पुलाची उंची वाढविली नाही.
परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पुलाची उंची वाढविण्याची मागणी दिलवर रामटेके, आर.एम. नंदागवळी यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.