तिरोडा : बिरसी मार्गावरील मलपुरी रस्त्याजवळ अर्धवट रस्ता बांधकाम करण्यात आले असून येथे कामे सुरु असल्याचे कुठलेही फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
बिरसी-मलपुरी मार्गावरील राईस मिल जवळून मलपुरी गावाकडे तिरोडा-तुमसर-गोंदिया मार्गाचे सिमेंटीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून बारबरीक कंपनीद्वारे सुरु आहे. मलपुरी मार्गाजवळ सुमारे तीनशे फूट रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आहे. येथे एकतर्फी वाहतूक सुरु आहे. रस्ता बांधकाम सुरु असल्याचे याठिकाणी कुठलेही फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अर्धवट बांधकाम वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट रोजी येथील डॉ. सुरेश चौरसिया व बारेवार दुचाकीवरून विर्सीकडे जात असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाच्या लाईटमुळे त्यांचे डोळे दिपले यातच त्यांचे वाहन रस्ता बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लीप झाले. यात त्यांना दुखापत झाली. मागील दोन दिवसात याठिकाणी तीन ते चार अपघात घडले आहेत. त्यामुळे बारबरीक कंपनीने याठिकाणी बांधकाम सुरु असल्याचे फलक लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.