लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या बघता बेड उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णांची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावात रूग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यात गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, वेळप्रसंगी जीव गमवावा लागत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड तपासणी केंद्र वाढवावीत तसेच कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने तपासणी करावी व कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. कोरोनासंदर्भात तालुका स्तरावरील संपर्क केंद्र गतिमान करण्यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी बडोले यांनी केली आहे.